नवी दिल्ली - भारताकडील परकीय चलनाच्या साठ्यात लक्षणीय घट झाली आहे. १७ सप्टेंबर २०२१ रोजी संपलेल्या आठवड्यात भारताकडील परकीय चलनाचा साठा १.४७ अब्ज डॉलरने घटून ६३९.६४२ अब्ज डॉलर एवढा झाला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी ही आकडेवारी जाहीर केली आहे. तत्पूर्वी १० सप्टेंबर २०२१ रोजी संपलेल्या आठवड्यातही भारताकडील परकीय चलन साठ्यात १.३४ अब्ज डॉलरने घट होऊन तो ६४१.११३ अब्ज डॉलर एवढा राहिला होता. (Big shock to India, significant decline in foreign exchange reserves)
तत्पूर्वी ३ सप्टेंबर २०२१ रोजी संपुष्टात आलेल्या आठवड्यात परकीय चलनसाठा ८.८९५ अब्ज डॉलरने वाढून ६४२.४५३ अब्ज डॉलरवर पोहोचला होता. तर २७ ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यामध्ये परकीय चलनाचा साठा १६.६६३ अब्ज डॉलरने वाढून ६३३.५५८ अब्ज डॉलर एवढा झाला होता.
रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीमध्ये सांगण्यात आले की, १७ सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यामध्ये परकीय चलनसाठ्यामध्ये झालेली घट ही एफसीएमध्ये झालेल्या घटीमुळे झाली आहे. एफसीए हा परकीय चलन साठ्याचा एक महत्त्वाचा भाग आहे.
रिझर्व्ह बँकेने सांगितले की, रिपोर्टिंग विकमध्ये देशाच्या एफसीए ८९.२ कोटी डॉलरने घटून ५७७.९८६ अब्ज डॉलर एवढा राहिला आहे. डॉलरमध्ये सांगण्यात येणाऱ्या परकीय चलनाच्या साठ्यामध्ये असलेल्या युरो, पाऊंड्स आणि येनसारख्या अन्य चलनांचा प्रभावही त्यावर पडत असतो.