शार्क टँक इंडिया हा स्टार्टअप्ससाठी अतिशय खास कार्यक्रम आहे. सोनी लिव्हवर येत असलेल्या या कार्यक्रमात अनेक स्टार्टअप्स येतात आणि काही जजेससमोर आपलं पिच सादर करतात. यानंतर जजेसना ते स्टार्टअप योग्य वाटल्यास त्यांच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाते.
शार्क टँक इंडियाचे दोन सीझन आले आहेत आणि लोक तिसर्या सीझनची आतुरतेनं वाट पाहत आहेत. शार्क टँक इंडियाच्या (Shark Tank India Season 3) तिसऱ्या सीझनची वाट पाहणाऱ्या लोकांपैकी तुम्हीही असाल, तर तुमची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. Sony Liv ने स्वतः शार्क टँक इंडिया बाबत एक मोठं अपडेट दिलंय. या सीझनमध्ये कोण जज असतील हेही सोनी लिव्हनं सांगितलंय.
सुरू झालं शूटिंग
सोनीनं यासंदर्भातील अपडेट देत तिसऱ्या सीझनचं शूटिंग सुरू झाल्याची माहिती दिली. शार्क टँक इंडियाचा पहिला सीझन २० डिसेंबर २०२१ पासून ४ फेब्रुवारी २०२२ पर्यंत लाईव्ह झाला होता. त्यानंतर याचा दुसरा सीझन २ जानेवारी २०२३ ते १० मार्च २०२३ या कालावधीत लाईव्ह झाला होता. तिसरा सीझन केव्हापासून लाईव्ह होईल याबाबत सध्या कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही. परंतु याचं शूटिंग सुरू झाल्याचं सांगण्यात आलंय. त्यामुळे आता लवकरच पुन्हा एकदा शार्क टँक इंडियाचा तिसरा सीझन पाहायला मिळेल.
कोण असतील जज?
शार्क टँकच्या तिसऱ्या सीझनमध्ये पुन्हा एकदा अनुपम मित्तल, अमन गुप्ता, नमिता थापर, विनीता सिंह आणि अमित जैन जज म्हणून दिसणार आहेत. सोनी लिव्हनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटोही शेअर केलाय. तर दुसऱ्या सीझनमध्ये शो होस्ट केलेला आणि स्टँडअप कॉमेडियन असलेला राहुल दुआ पुन्हा एकदा होस्ट म्णून दिसणारे.