Join us

स्वत: बुडालाच, दुसऱ्यांनाही बुडवलं; Elvish Yadav नं सांगितलेला स्टॉक १५ महिन्यांत १३५ वरुन आला ७ वर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 1:48 PM

शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा किंवा स्वतःचं संशोधन करावं, असं अनेकदा म्हटलं जातं. असं न केल्यास तुम्हाला मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं. असाच काहीसा प्रकार यातून दिसून येत आहे

शेअर बाजारातगुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा किंवा स्वतः संशोधन करावं, असं अनेकदा म्हटलं जातं. असं न केल्यास तुम्हाला मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं. बिग बॉस ओटीटी विजेता एल्विश यादवनं (Elvish Yadav) हे पुन्हा एकदा सिद्ध केलंय. दरम्यान, सोशल मीडियावर एल्विश यादव यानं लोकांना पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता. परंतु आता गेल्या १५ महिन्यांत हा शेअर ९५ टक्क्यांनी घसरलाय. त्यामुळे एल्विश यादवला सोशल मीडियावर लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. त्याचबरोबर अनेकजण त्याची खिल्लीही उडवत आहेत.  

शॉर्ट टर्मसाठी सांगितलेला चांगला 

एल्विश यादवनं १९ डिसेंबर २०२२ रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर केलेल्या ट्विटमध्ये त्याच्या फॉलोअर्सना हा स्टॉक सुचवला होता. या स्टॉकचे नाव आहे – व्हाईट ऑरगॅनिक रिटेल (White Organic Retail). "माझ्या शेअर मार्केटच्या लोकांसाठी. आज मी पोर्टफोलिओमध्ये WORL @₹१२८-१३५ अॅड केला आहे. शॉर्ट टर्मसाठी हा चांगला वाटतोय," असं एल्विश यादवनं लिहिलं होतं. 

 

९५ टक्क्यांनी घसरला 

एल्विश यादवच्या या ट्विटनंतर एका दिवसात शेअर ७ टक्क्यांनी वाढला. मात्र, यानंतर शेअरमध्ये मोठी घसरण दिसून आली आणि आतापर्यंत तो ९५ टक्क्यांनी घसरला आहे. ११ मार्च रोजी हा शेअर ०.८१ टक्क्यांनी घसरून ७.३९ रुपयांवर बंद झाला. कंपनीचं मार्केट कॅप सध्या २४.१८ कोटी रुपये आहे. कोविड महासाथीच्या काळात कमी व्याजदरामुळे शेअर बाजाराला चालना मिळाल्यानं व्हाईट ऑरगॅनिक रिटेलचे शेअर्स वाढले. मे २०२१ ते फेब्रुवारी २०२२ पर्यंत स्टॉक २६ पट वाढला. मात्र, त्यानंतर शेअरमध्ये घसरण दिसून आली. 

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :बिग बॉसशेअर बाजारगुंतवणूक