Laxmi Nivas Bungalow: मुंबईमध्ये एकापेक्षा एक महागड्या इमारती आहेत. पण, सध्या मुंबईतील 85 वर्षे जुनी इमारत चर्चेत आली आहे. नेपियन सी रोडवर 1940 मध्ये बांधलेला एक बंगला विकला गेला आहे. अतिशय जीर्ण आणि खराब अवस्थेत असलेला हा बंगला त्याच्या किमतीमुळे चर्चेत आहे. स्वातंत्र्यापूर्वी बांधलेला हा बंगला तब्बल 276 कोटी रुपयांना विकण्यात आला आहे.
लक्ष्मी विलास बंगल्याचा 276 कोटींना सौदा
मुंबईतील नेपियन सी रोडवर 1940 मध्ये बांधलेला लक्ष्मी निवास बंगला विकण्यात आला आहे. 2221 स्क्वेअर यार्ड परिसरात बांधलेल्या या बंगल्याला नवीन खरेदीदार मिळाला आहे. एकेकाळी स्वातंत्र्याच्या चळवळीचे केंद्र असलेला हा दुमजली बंगला आता मुंबईच्या बाजारपेठेतील सर्वात महागड्या रिअल इस्टेट व्यवहारांपैकी एक आहे. या बंगल्यासाठी मिळालेल्या किमतीमुळे तो चर्चेत आला आहे.
कपाडिया कुटुंबाकडे या बंगल्याची मालकी होती, पण आता त्यांनी हा बंगला विकला आहे. वागेश्वरी प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडने हा बंगला 276 कोटी रुपयांना विकत घेतला आहे. विशेष म्हणजे, ही इमारत कपाडिया कुटुंबीयांनी कधीकाळी फक्त 1.20 लाख रुपयांना विकत घेतली होती. आज या इमारतीचे त्यांना 276 कोटी मिळाले आहेत.
लक्ष्मी निवास बंगल्याचे नवीन मालक कोण आहे?
वागेश्वरी प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडकडे या बंगल्याची मालकी गेली आहे. विशेष बाब म्हणजे, या कंपनीच्या डायरेक्टर्सपैकी एक अलिना निखिल मेसवानी आहेत. त्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या बोर्डाचे कार्यकारी संचालक निखिल आर मेसवानी यांच्या पत्नी आहेत. 276 कोटी रुपयांच्या या डीलमध्ये जमीन आणि इमारत, या दोन्हींचा समावेश आहे.
बंगल्याचे ऐतिहासिक महत्व
भारत छोडो आंदोलनादरम्यान लक्ष्मी निवास बंगला हे स्वातंत्र्यसैनिकांचे गुप्त ठिकाण होते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद रेडिओचे प्रक्षेपणही याच बंगल्यातून होत असे. कपाडिया कुटुंबाने 1917 मध्ये पारशी कुटुंबाकडून 1.20 लाख रुपयांना हा बंगला खरेदी केला होता. झॅपकीच्या मते, हा करार मुंबईतील सर्वात महागड्या रिअल इस्टेट डीलपैकी एक आहे.