Join us

खनिज तेलाच्या किमतीत आखाती युद्धानंतरची सर्वाधिक मोठी घट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 5:22 AM

बाजार आणखी अस्थिर होऊ नये यासाठी तेल निर्यातदार देसांच्या ‘ओपेक’ या संघटनेने गेल्या आठवड्यात उत्पादनात कपात करून बाजारातील तेलाची उपलब्धता कमी करण्याचा प्रस्ताव केला होता.

न्यूयॉर्क : सौदी अरबस्तानने दर कमी केल्याने आणि पुढील महिन्यापासून उत्पादनात वाढ करण्याचे जाहीर केल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाच्या किंमतीत सोमवारी सरासरी २५ टक्क्यांची घसरण झाली. किमतींमधील ही घट सन १९९१च्या पहिल्या आखाती युद्धानंतरची सर्वात मोठी आहे.

ब्रेंट क्रुड तेलाचा कंत्राटी खरेदीचा दर सकाळी बॅरेलला ३० डॉलरपर्यंत खाली येऊन दुपारी ३३.९६ डॉलरवर स्थिरावला. शनिवारच्या तुलनेत हा दर बॅरेलमागे ११.३१ डॉलरने कमी होता. यूएस वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट या दर्जाच्या तेलाच्या किंमतीही २६ टक्क्यांनी घटून ३०.५५ डॉलर प्रति बॅरल एवढ्या खाली आल्या. बाजारातील ही घसरण आणखी काही आठवडे सुरु राहील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.कोरोना साथीच्या जगभरातील वाढत्या प्रसाराने अनेक प्रमुख देशांच्या अर्थव्यवस्थांवर विपरित परिणाम झाला असून तेलाची मागणी कमी झाली आहे. साहजिकच त्याने तेल बाजारातही मंदी आली.

बाजार आणखी अस्थिर होऊ नये यासाठी तेल निर्यातदार देसांच्या ‘ओपेक’ या संघटनेने गेल्या आठवड्यात उत्पादनात कपात करून बाजारातील तेलाची उपलब्धता कमी करण्याचा प्रस्ताव केला होता. परंतु त्याला न जुमानता सौदी खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचा निर्यातदार असलेल्या रशियाने उलट उत्पादन वाढविले. रशियाला धडा शिकविण्यासाठी सौदी अरबस्ताननेही किंमती कमी करून येत्या एप्रिलपासून दैनंदिन तेल उत्पादन वाढवून १० दशलक्ष बॅरेलहून अधिक करण्याचे ठरविले. परिणामी मागणीच्या तुलनेत मुबलक तेल बाजारात येणार हे दिसल्याने कंत्राटी खरेदीचे दर कोसळले.भारताची परकीय चलन गंगाजळी सर्वोच्च पातळीवरतेलाच्या किंमतींमधील घसरण व कोरोनामुळे एकूणच आंतरराष्ट्रीय व्यापारात आलल्या मंदीमुळे भारताची परकीय चलनाची गंगाजळी फेब्रुवारी अखेरीस ४८१.५ अब्ज डॉलर एवढ्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली. गेले सलग २३ आठवडे ही गंगाजळी सतत वाढत आहे. सप्टेंबरपासून ही वाढ ५३ अब्ज डॉलर एवढी झाली आहे.भारताला मोठा लाभतेलाच्या किंमतीत होणाºया प्रत्येक डॉलरच्या घटीने भारताचा तेल आयातीचा वार्षिक खर्च सुमारे १.६ अब्ज डॉलरने कमी होऊ शकतो. गेल्या वर्षी भारताचे ११२ अब्ज डॉलर तेल आयातीवर खर्च झाले होते.

टॅग्स :खनिज तेल