Join us

आॅगस्टमध्ये सोने आयातीत मोठी वाढ

By admin | Published: September 14, 2015 1:02 AM

जागतिक बाजारात सोन्याच्या किमती घटत असतानाच भारतात आॅगस्टमध्ये या मौल्यवान धातूची १२० टनापेक्षा अधिक आयात झाली. चालू वित्तीय वर्षातील हा सर्वांत मोठा आकडा आहे

नवी दिल्ली : जागतिक बाजारात सोन्याच्या किमती घटत असतानाच भारतात आॅगस्टमध्ये या मौल्यवान धातूची १२० टनापेक्षा अधिक आयात झाली. चालू वित्तीय वर्षातील हा सर्वांत मोठा आकडा आहे.एका अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला सांगितले की, चालू वित्तीय वर्षातील आतापर्यंतच्या सहा महिन्यांतील ही सर्वाधिक आयात आहे. १२० टनांपेक्षा जास्त आयात झाली आहे. आगामी सणासुदीचे दिवस ध्यानात घेऊन ही आयात वाढली आहे.हा अधिकारी म्हणाला की, आम्ही बाजारातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. सध्या सोन्याचे आयात शुल्क १० टक्के आहे. बाजारातील परिस्थिती पाहून आयात शुल्काबाबत निर्णय घेतला जाईल. गेल्यावर्षी आॅगस्टमध्ये ५० टन सोने आयात झाले होते. जुलै २०१५ मध्ये हा आकडा ८९ टन होता. जुलैमध्ये जागतिक बाजारात सोन्याचे भाव प्रचंड घसरले होते. त्यामुळे भारत आणि चीन या देशांमधून सोन्याची आयात वाढली होती.भारत दरवर्षी हजार टन सोन्याची आयात करतो. त्यामुळे कच्च्या तेलानंतर भारत सोन्याच्या आयातीवरच जास्त खर्च करतो, या पार्श्वभूमीवर सोन्याच्या खरेदीवरून लक्ष हटविण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्या आठवड्यात ‘सुवर्ण मौद्रीकरण’ आणि ‘सार्वभौम सुवर्ण रोखे’ या दोन योजनांना मंजुरी दिली होती. घराघरांत आणि विविध संस्थांत असलेले सोने बाहेर काढून त्याचा उत्पादनात वाढ करण्याचा त्यामागचा हेतू आहे. दिवाळीच्या आसपास सोन्याची मागणी आहे. त्यावेळी या दोन योजना लागू होण्याची शक्यता आहे.