Join us

सणासुदीला महागड्या वस्तूंच्या विक्रीत मोठी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2017 3:08 AM

अर्थव्यवस्था मंदीत आल्याचे बोलले जात असतानाच नवरात्र आणि दस-याच्या हंगामात उच्च श्रेणीतील (प्रीमियम क्वॉलिटी) कार, टीव्ही, रेफ्रिजरेटर यांच्या मागणीत १५ टक्के वाढ झाली आहे.

कोलकाता : अर्थव्यवस्था मंदीत आल्याचे बोलले जात असतानाच नवरात्र आणि दस-याच्या हंगामात उच्च श्रेणीतील (प्रीमियम क्वॉलिटी) कार, टीव्ही, रेफ्रिजरेटर यांच्या मागणीत १५ टक्के वाढ झाली आहे. प्रीमियम वस्तूंसाठी दिवाळीचा हंगामही असाच तेजीत राहील, असा अंदाज आहे. नोटाबंदी आणि जीएसटी यांचा प्रतिकूल परिणाम केवळ ग्राहकोपयोगी वस्तूंच्या विक्रीपुरताच मर्यादित राहील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.मारुती सुझुकी, ह्युंदाई मोटार्स, एलजी, सोनी, पॅनासोनिक आणि गोदरेज या कंपन्यांच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, संपूर्ण देशात उच्च श्रेणीतील (प्रीमियम) उत्पादने खरेदी करण्याचा कल दिसून येत आहे. अगदी छोट्या शहरांतही हाच कल आहे. चांगला पाऊस आणि स्वस्त कर्जाची उपलब्धता, यामुळे मागणीत वाढ झाली आहे.सोनी इंडियाचे विक्रीप्रमुख सतीश पद्मनाभन यांनी सांगितले की, नवरात्रीत चांगली खरेदी झाली. छोट्या शहरांतही उच्च श्रेणीचे ६५ हजार रुपये किमतीचे, तसेच मोठे स्क्रीन असलेले ४के सारखे टीव्ही खरेदी करण्याकडे लोकांचा कल दिसून आला. आतापर्यंत हे टीव्ही केवळ मोठ्या शहरांतच खरेदी केले जात होते. एलजी इलेक्ट्रॉनिक्सचे सीएमओ अमित गुजराल यांनी सांगितले की, जीएसटीचा परिणाम आता ओसरू लागला आहे. आमच्या कंपनीची विक्री तब्बल ३0 टक्क्यांनी वाढली आहे.देशाची सर्वांत मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीच्या विक्रीत १८ टक्के वाढ झाली आहे. ह्युंदाईची विक्री ५0 टक्क्यांनी वाढली. मारुतीचे वरिष्ठ कार्यकारी संचालक आर. एस. कलसी यांनी सांगितले की, ओणम आणि गणेश चतुर्थीच्या काळात विक्रीमध्ये जी वाढ झाली, ती नवरात्रातही कायम राहिली. ह्युंदाईचे विक्री आणि विपणन संचालक राकेश श्रीवास्तव यांनी म्हटले की, कंपनीने नवरात्रीत २६ हजारांपेक्षा जास्त गाड्या विकल्या असाव्यात. दिवाळीतहीहीच गती कायम राहील, असेदिसते.फ्रॉस्ट-फ्री फ्रीज, इन्व्हर्टर एसी, मोठ्या क्षमतेच्या वॉशिंग मशिन यांची विक्रीही जबरदस्त राहिल्याचे उत्पादकांनी सांगितले. एलजी, सॅमसंग, सोनी आणि पॅनासोनिक या कंपन्यांच्या विक्रीत २५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली. (वृत्तसंस्था)याचाच अर्थ उच्च मध्यम वर्गाला जीएसटी वा महागाईचा फटका बसलेला नाही. ग्राहकोपयोगी वस्तूंच्या विक्रीवर मात्र परिणाम होत आहे. म्हणजे मध्यम वर्ग व गरीब यांना महागाईची चांगलीच झळ पोहोचली असून, हा वर्ग मात्र अद्याप अशा खरेदीपासून दूरच आहे. सरकारी कर्मचाºयांच्या खरेदीमध्ये मात्र वाढ दिसत आहे.