Join us  

सगळ्यात मोठा प्रश्न, ३० जूनच्या स्टॉकचे काय?

By admin | Published: June 26, 2017 1:00 AM

कृष्णा, १ जुलैपासून जीएसटी लागू होणार आहे, अनेक करदात्यांकडे खूप प्रमाणात स्टॉक असतो, तर ३० जून २०१७ च्या स्टॉकचे काय करायचे?

अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, १ जुलैपासून जीएसटी लागू होणार आहे, अनेक करदात्यांकडे खूप प्रमाणात स्टॉक असतो, तर ३० जून २०१७ च्या स्टॉकचे काय करायचे?कृष्ण: (काल्पनिक पात्र) : अर्जुना, ३० जूनपर्यंत व्हॅट, सीएसटी, सर्व्हिस टॅक्स हे कायदे आहेत, पण १ जुलैपासून जीएसटी लागू होणार आहे, तर ३० जूनच्या स्टॉकचे काय करायचे, हा खूप मोठा प्रश्न सर्वांना पडला आहे. याबाबतीत संभ्रम निर्माण झाला आहे. आता ज्या गोष्टीवर व्हॅट लागतो, जीएसटीमध्ये त्याचे एसजीएसटीमध्ये रूपांतर होणार आहे. त्याचप्रमाणे, आता ज्या गोष्टीवर एक्साइज ड्युटी लागते, जीएसटीमध्ये त्याचे सीजीएसटीमध्ये रूपांतर होणार आहे. करदात्याकडे असलेल्या स्टॉकचे जीएसटीमध्ये क्रेडिट मिळेल की नाही, यावर आपण सविस्तर चर्चा करू या!अर्जुन: कृष्णा, एखादी करपात्र व्यक्ती व्हॅट कायद्यात नोंदणीकृत असेल, त्या व्यक्तीला जीएसटीमध्ये स्टॉकचा सेट आॅफ कसा मिळेल ? कृष्ण: अर्जुना, करदात्याकडे असलेल्या स्टॉकचे क्रेडिट घेण्यासाठी दोन बाबी लक्षात घ्याव्या. १. व्हॅटच्या ३० जून २०१७ च्या रिटर्नमध्ये व्हॅट भरायचा बाकी असेल, म्हणजे करपात्र व्यक्तीने खरेदीवरचे क्रेडिट वापरलेले आहे. त्यामुळे जीएसटीमध्ये क्रेडिट घेण्याचा विषयच येत नाही. २. ३० जून २०१७ च्या व्हॅट रिटर्नमध्ये व्हॅट जर कॅरीफॉरवर्ड असेल, तर करपात्र व्यक्तीला जेवढा व्हॅट कॅरीफॉरवर्ड आहे, तेवढे एसजीएसटीच्या बदल्यात क्रेडिट मिळेल. उदा. जर करदात्याला रु. १०,५००चा कॅरीफॉरवर्ड असेल, तर एसजीएसटीच्या लायबिलिटीसमोर तो पूर्ण अ‍ॅडजेस्ट होईल. अर्जुन: एखादी करपात्र व्यक्ती एक्साइज कायद्यात नोंदणीकृत असेल, तर त्याला जीएसटीमध्ये स्टॉकचा सेट आॅफ कसा मिळेल?कृष्ण: अर्जुना, याच्यातही जवळपास व्हॅटसारखेच आहे. जर करदाता एक्साइज कायद्यात नोंदणीकृत असेल व त्याच्या एक्साइजच्या ३० जून २०१७ च्या रिटर्नमध्ये जर एक्साइज ड्युटी पेयेबल असेल, तर सेट आॅफचा प्रश्नच येत नाही, पण एक्साइज कॅरीफॉरवर्ड असेल, तर त्याला सीजीएसटीच्या बदल्यात सेट आॅफ मिळेल.अर्जुन: कृष्णा, जर करदाता एक्साइज कायद्यात नोंदणीकृत नसेल, तर त्याला जीएसटीमध्ये स्टॉकचे क्रेडिट मिळेल का?कृष्ण: अर्जुना, करदाता एक्साइज कायद्यात नोंदणीकृत नसेल व व्हॅटमध्ये नोंदणीकृत असेल, तर त्याला व्हॅटच्या बदल्यात एसजीएसटीमध्ये क्रेडिट मिळेल, परंतु सीजीएसटीचे क्रेडिट कसे मिळेल. ज्या वस्तूचा स्टॉक आहे, त्या वस्तू खरेदीच्या बिलावर एक्साइज ड्युटी लागून आलेली असेल, तर जीएसटीमध्ये त्याचे सीजीएसटीच्या बदल्यात १०० टक्के क्रेडिट मिळेल, पण स्टॉकच्या बिलावर एक्साइज ड्युटी लावून आलेली नसेल, तर त्यात त्याच्या जीएसटीच्या दराप्रमाणे क्रेडिट खालीलप्रमाणे मिळेल. १. तो स्टॉक जर जीएसटीच्या १८ टक्के किंवा २८ टक्के दरात मोडत असेल, तर त्या स्टॉकचे क्रेडिट सीजीएसटीच्या ६० टक्के मिळेल. उदा. जसे स्पेअर पार्ट्सवर १८ टक्के जीएसटीचा दर आहे, तर त्याचे ३० जूनला जो स्टॉक आहे, त्यावरचे (सीजीएसटीच्या ९ टक्क्यांचे ६० टक्के) ५.४ टक्के क्रेडिट मिळेल. २. स्टॉक जर जीएसटीच्या ५ टक्के किंवा १२ टक्के दरात मोडत असेल, तर त्यावर सीजीएसटीच्या दराच्या एकूण ४० टक्के क्रेडिट मिळेल. उदा. जर एखाद्या गोष्टीवर १२ टक्के जीएसटी आहे, तर त्याचे (सीजीएसटीच्या ६ टक्क्यांचे ४० टक्के) २.४ टक्के क्रेडिट मिळेल.अर्जुन : कृष्णा, जीएसटीमध्ये स्टॉकचे क्रेडिट घ्यायचे असेल, तर करदात्याला काय करावे लागेल ?कृष्ण: अर्जुना, करदात्याला टीआरएएन -१ हा फॉर्म भरून द्यावा लागेल. त्यात एचएसएन कोडनुसार वस्तूची माहिती, त्यांचे प्रमाण, त्याचा दर, त्याची संपूर्ण रक्कम याची सर्व माहिती द्यावी लागेल. ही संपूर्ण माहिती ९० दिवसांच्या आत शासनाला द्यावी लागेल. जीएसटीमध्ये करदात्याला वस्तू विकताना याचे क्रेडिट वापरता येईल, तसेच करदात्याला एक वर्षापर्यंत असलेल्या स्टॉकचे क्रेडिट मिळेल. त्यापूर्वीच्या स्टॉकचे क्रेडिट मिळणार नाही. म्हणजेच ३० जून २०१६ नंतर खरेदी केलेल्या वस्तूंचे स्टॉक असेल, तर त्याचेच क्रेडिट मिळेल.कृष्णा, करदात्याने यातून काय बोध घ्यावा?-अर्जुना, प्रत्येक व्यापाऱ्याने लक्षपूर्वक या स्टॉकच्या तरतुदी समजून घ्याव्या. घाईगडबड करून चालणार नाही. प्रत्येकाने आधी आर्थिक वर्ष २०१६-१७ ची वह्या-पुस्तके तपासून, जर व्हॅटचे रिटर्न रिव्हाइज करण्याची गरज असेल, तर ते करावे व नंतर एप्रिल ते जूनचे रिटर्न दाखल करावे. व्हॅट, एक्साइजचे रिटर्न हिशोबाच्या वह्या-पुस्तकांसोबत जुळवून नंतर शासनाला फॉर्म दाखल करावा.