सर्वच शेअर बाजारांमध्ये असलेली मंदी, अमेरिकेतील व्याजदरांमध्ये वाढ होण्याची निर्माण झालेली शक्यता, त्यामुळे परकीय वित्तसंस्थांची वाढलेली विक्री, वाढती चलनवाढ, इंधनाचे दर अशा विविध कारणांनी शेअर बाजार खाली येत आहे. त्यातच अर्थसंकल्पामध्ये बाजाराला मारक ठरणाºया काही तरतुदींनी घसरण वाढली. बाजाराने गेल्या ६ महिन्यांतील सर्वाधिक साप्ताहिक घसरण अनुभवली आहे.
गेल्या ३ महिन्यांपासून सातत्याने नवनवीन विक्रम करणाºया बाजाराला गेल्या ३ आठवड्यांपासून घसरणीचा सामना करावा लागत आहे. मागील सप्ताहाचा प्रारंभच संवेदनशील निर्देशांक खाली येऊन झाला. सप्ताहात हा निर्देशांक ३४८७४.१७ ते ३३४८२.८१ अंशांदरम्यान हेलकावत होता. सप्ताहाच्या अखेरीस तो ३४००५.७६ अंशांवर बंद झाला. मागील बंद निर्देशांकाच्या तुलनेत त्यामध्ये १०६०.९९ अंश म्हणजेच सुमारे तीन टक्के घट झाली. राष्टÑीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी)सुद्धा ३०५.६५ अंशांनी खाली येऊन १०४५४.९५ अंशांवर बंद झाला. या दोन्ही निर्देशांकांनी आॅगस्ट महिन्यानंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर साप्ताहिक घसरण अनुभवली आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप या निर्देशांकांमध्ये मात्र वाढ झाली आहे.
भारतीय रिझर्व्ह बॅँकेने आपल्या द्वैमासिक पतधोरणामध्ये अपेक्षेप्रमाणे व्याजदर कायम राखले असले, तरी चलनवाढ होण्याची भीती व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे, अमेरिकेमध्ये व्याजदर वाढण्याची शक्यता निर्माण झाल्याने, परकीय वित्तसंस्थांनी भारतीय बाजारातील विक्री वाढविली आहे. या संस्थांनी गतसप्ताहात ७३.८ अब्ज रुपये काढून घेतले. परस्पर निधी आणि वित्तसंस्थांनी खरेदी करून बाजाराच्या घसरणीला थांबविण्याचा प्रयत्न केला.
अमेरिकेतील डो जोन्स निर्देशांकाने गतसप्ताहामध्ये दोन वेळा एक हजार अंशांनी घसरण अनुभवली. युरोपातील शेअर बाजारांमध्येही मंदी होती. चलनवाढीच्या भीतीने जगभरातील बाजार गारठले आहेत.
आयआयएसएलने सुरू केले नवीन निर्देशांक-
इंडिया इंडेक्स सर्व्हिसेस अँड प्रॉडक्ट लि. (आयआयएसएल) या राष्टÑीय शेअर बाजाराच्या निर्देशांकविषयक आस्थापनेने १० फेब्रुवारी रोजी ७५ नवे निर्देशांक सुरू केले आहेत. फिक्स्ड इन्कम आणि हायब्रीड योजनांशी संबंधित हे निर्देशांक आहेत. यामुळे या योजनांमध्ये मिळणारा परतावा आणि त्यांची कार्यतत्परता याची माहिती संबंधितांना मिळू शकणार आहे.
निफ्टी फिक्स्ड इन्कम इंडेक्स श्रेणीमध्ये ७२ निर्देशांक आहेत, तर ३ निर्देशांक हायब्रीड योजनांबाबतचे आहेत. निफ्टी ५० हायब्रीड कंपोझिट डेट ७०:३०, निफ्टी ५० हायब्रीड कंपोझिट डेट ५०:५० आणि निफ्टी ५० हायब्रीड कंपोझिट डेट १५:८५ असे हे तीन निर्देशांक आहेत.
फक्स्ड इन्कम सिरीजमध्ये सरकारी बॉण्डस्, ट्रेझरी बिल्स, विविध पतमानांकनाचे कॉर्पाेरेट बाँडस्, कमर्शियल पेपर्स, मुदत ठेवी आदींमधील मालमत्तेचा विचार करून त्यांची मूल्यनिश्चिती करण्यात येणार आहे.
बाजारात ६ महिन्यांतील सर्वाधिक साप्ताहिक घट
सर्वच शेअर बाजारांमध्ये असलेली मंदी, अमेरिकेतील व्याजदरांमध्ये वाढ होण्याची निर्माण झालेली शक्यता, त्यामुळे परकीय वित्तसंस्थांची वाढलेली विक्री, वाढती चलनवाढ, इंधनाचे दर अशा विविध कारणांनी शेअर बाजार खाली येत आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 12:13 AM2018-02-12T00:13:19+5:302018-02-12T00:13:38+5:30