अख्खं विश्व आज ज्या कॉप्युटरमध्ये सामावलं आहे, त्या विश्वात डोकावण्यासाठी हक्काची 'विंडो' निर्माण करणारे मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांचं आयुष्य प्रत्येकासाठीच प्रेरणादायी आहे. बुद्धिवंत, लक्ष्मीवंत आणि दानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा सगळेच आदर करतात. त्यांच्या दूरदर्शीपणाला तर तोडच नाही. परंतु, एका बाबतीत काळाची पावलं ओळखू न शकल्याची खंत बिल गेट्स यांना वाटते.
अत्यंत शांत, विनम्र आणि विचारी अशा बिल गेट्स यांच्याकडून काही चूक होऊ शकते, हे खरं तर न पटणारंच आहे. परंतु, अँड्रॉइड विकत न घेणं ही आपल्या आयुष्यातील मोठी चूक होती, अशी कबुली त्यांनी स्वतःच दिली आहे.
आज तुमचं आमचं आयुष्य 'अँड्रॉइड'मय झालंय, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. जुलै २००५ मध्ये गुगलनं अँड्रॉइड हे तंत्रज्ञान ५० दशलक्ष डॉलर्स - म्हणजेच सुमारे ३४७ कोटी रुपयांना खरेदी केलं होतं. या तंत्रज्ञानाचं ते नेमकं काय करणार आहेत, हे त्यांनी खुबीनं गुलदस्त्यात ठेवलं होतं. मायक्रोसॉफ्टचंही त्याकडे जरा दुर्लक्षच झालं. ते आपल्या विंडोज मोबाईलवर काम करत राहिले. २०१० च्या अखेरीस विंडोज फोन बाजारात दाखल झाले खरे, पण तोपर्यंत अँड्रॉइडनं मोबाईलविश्व व्यापून टाकलं होतं. या एका चुकीमुळे मायक्रोसॉफ्टचं अब्जावधींचं नुकसान झालंच, पण अव्वल स्थान गमावल्याची सल बिल गेट्स यांना बोचतेय.
ज्याचा मोबाईल विश्वात बोलबाला... तोच राजा!
सॉफ्टवेअर क्षेत्राचा विचार करायचा झाल्यास, मोबाईल विश्वात ज्याची चलती, तोच इथे राज्य करतो. नेमकी हीच गोष्ट त्यावेळी माझ्या लक्षात आली नाही. त्याच चुकीमुळे आज अँड्रॉइड ज्या शिखरावर आहे, तिथे मायक्रोसॉफ्ट पोहोचू शकली नाही, असं बिल गेट्स यांनी प्रांजळपणे सांगितलं.
अॅपलशिवाय बाजारात आणखी एका ऑपरेटिंग सिस्टीमसाठी जागा होती. गुगलने वेळ न दवडता ती भरून काढली. मायक्रोसॉफ्टही ही संधी साधू शकत होतं. पण गुगलने बाजी मारली. विंडोज आणि ऑफिस या तंत्रज्ञानांच्या आधारे मायक्रोसॉफ्टनं मोठी झेप घेतली. परंतु, अँड्रॉइड हातातून सुटलं नसतं, तर आज मायक्रोसॉफ्ट जगातील अव्वल नंबरी कंपनी असती, अशी 'मन की बात' बिल गेट्स यांनी एका मुलाखतीत केली.