नवी दिल्ली-
कोरोना काळानंतर भारतानं जगाला सावरलं आहे. देश वेगानं प्रगती करत असून वाढत्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून उभारी घेत आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेचा वाढता वेग येत्या काळातही असाच सुरू राहिलं असा विश्वास अब्जाधीश आणि जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत पाचव्या स्थानावर असलेले उद्योगपती बिग गेट्स यांनी व्यक्त केला आहे. मायक्रोसॉप्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी आपल्या 'गेट्स नोट्स'मध्ये भारताच्या भविष्याबाबत काही महत्वाच्या नोंदी केल्या आहेत.
"भारताचं भविष्य खूप आशादायी आहे आणि निश्चितच दावा करणारं आहे की भारत मोठ्या समस्यांना एका फटक्यात सोडवू शकतो. मग भले जग अनेक संकटांचा सामना का करत असेना, भारत संकटावरील समाधान देणारा देश आहे", असं बिल गेट्स यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे. योग्य कल्पकता आणि वितरण चॅनलसह जग एकाचवेळी मोठ्या समस्यांवर मात करू शकतं, असंही ते म्हणाले.
भारतानं स्वत:ला सिद्ध केलं
भारत माझ्यासाठी भविष्यात आशादायी चित्र निर्माण करणारा देश आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्येवाला देश बनण्याच्या दिशेनं भारत वाटचाल करत आहे आणि यावरुन एक गोष्ट स्पष्ट आहे की तुम्ही मोठ्या प्रमाणात समस्यांवर समाधान शोधल्याशिवाय त्यांचं निवारण करू शकत नाही. तरीही भारतानं सिद्ध केलं आहे की देश मोठमोठ्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी सज्ज आहे, असं बिल गेट्स यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे.
भारताच्या कामगिरीचं कौतुक
बिल गेट्स यांनी भारतानं राबवलेल्या यशस्वी योजनांचंही कौतुक केलं. "भारतानं पोलिओचं उच्चाटन केलं. HIV ट्रान्समिशन कमी करण्यात यश प्राप्त केलं, गरीबी कमी करण्यासाठी योग्य पावलं उचलली. याशिवाय देशातील बालमृत्यूच्या दरातही घट झाली आणि स्वच्छता तसंच वित्तीय सेवा लोकांपर्यंत पोहोचण्यात वाढ झाली. भारतानं जी उल्लेखनीय प्रगती केली आहे त्यापेक्षा उत्तम उदाहरण आणि प्रमाण दुसरं असू शकत नाही", असं बिल गेट्स यांनी म्हटलं आहे. बिल गेट्स यांनी पुढच्या आठवड्यात भारतात येणार असल्याचंही म्हटलं आहे. "मी पुढच्या आठवड्यात भारतात जातोय. खरंतर मी याआधी अनेक वर्ष भारतात राहिलो आहे. पण कोविड महामारीनंतर भारतात पहिल्यांदाच जाणार आहे", असं बिल गेट्स यांनी नमूद केलं आहे.