वॉशिंग्टन : भारताच्या ‘आधार’ तंत्रज्ञानाने नागरिकांच्या ‘प्रायव्हसी’चा कोणताही प्रश्न निर्माण होत नाही आणि हे तंत्रज्ञान अनुकरणीय असल्याने त्याचा इतर देशांमध्ये प्रसार करण्यासाठी आमच्या बिल अॅण्ड मेलिन्डा गेट््स फाउंडेशनने जागतिक बँकेस अर्थसाह्य दिले आहे, असे मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट््स यांनी म्हटले आहे.‘आधार’चे मुख्य शिल्पकार मानले गेलेले इन्फोसिसचे संस्थापक नंदन निलेकणी हे याकामी जागतिक बँकेस सल्ला व मदत देत आहेत, असेही गेट््स म्हणाले. ‘आधार’मुळे प्रायव्हसीचा भंग होत असल्यावरून व्यक्त केल्या जात असलेल्या चिंतेविषयी गेट््स म्हणाले की, ‘आधार’ ही केवळ व्यक्तीची ओळख पटविण्याची बायो आयडी योजना आहे, यात कोणाच्या प्रायव्हसीचा भंग होण्याचे काही कारण नाही. मात्र विविध कारणांसाठी वापरताना कोणता डेटा स्टोअर केला जात आहे व तो कोणाला उपलब्ध होत आहे, याची काळजी घ्यायला हवी. बँक खात्यांसाठी ‘आधार’चा उपयोग यादृष्टीने चांगल्या प्रकारे केला आहे.‘आधार’ ही जगातील सर्वात मोठी बायोमेट्रिक आयडी व्यवस्था असून भारतातील १०० कोटींहून अधिक नागरिकांनी ‘आधार’साठी नोंदणी केली आहे. (वृत्तसंस्था)जगातील इतर देशांनी ‘आधार’चे अनुकरण करावे का, या प्रश्नाला ठामपणे होकारार्थी उत्तर देत गेट््स असेही म्हणाले की, यामुळे प्रशासनाचा दर्जा सुधारत असल्याने याचा वापर नक्कीच व्हायला हवा. अशा तंत्रज्ञानाच्या वापरामुळे अर्थव्यवस्थेचा झपाट्याने विकास होतो व नागरिकांचे सक्षमीकरणही होते, असेही ते म्हणाले. मोदी पंतप्रधान होण्याच्या आधीपासून ‘आधार’ सुरू झाले. पण मोदींनी सत्तेवर आल्यानंतर या तंत्रज्ञानाची कास सोडली नाही हे कौतुकास्पद आहे, असेही ते म्हणाले.
बिल गेट्सनी केली ‘आधार’ची स्तुती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2018 5:33 AM