Rich vs Poor : गेल्या काही वर्षांपासून भारत विचित्र अवस्थेत अडकला आहे. कारण, इथे श्रीमंत अधिक धनवान होत चालला आहे. तर दुसरीकडे गरीबांची स्थिती बदलायला तयार नाही. केवळ भारतातच नाही तर जगभरात श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी दिवसेंदिवस रुंदावत चालली आहे. कोरोना काळात तर यात आणखी भर पडली. एकडीकडे अब्जाधीशांची संख्या वेगाने वाढली तर दुसरीकडे गरीबांची दोन वेळच्या जेवणाची भ्रांत निर्माण झाली. ऑक्सफॅम इंटरनॅशनलने दावोसमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमदरम्यान या संदर्भात एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. यातून धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.
ऑक्सफॅम इंटरनॅशनल या संस्थेने 'टेकर्स, नॉट मेकर्स' नावाचा जागतिक असमानतेवरील नवीन अहवाल सोमवारी जागतिक आर्थिक मंच (WEF) च्या वार्षिक बैठकीच्या काही तास आधी प्रसिद्ध करण्यात आला. या अहवाल अब्जाधीशांच्या संपत्तीत झालेल्या प्रचंड वाढीची तुलना करण्यात आली आहे. १९९० पासून गरिबीत जगणाऱ्या लोकांच्या संख्येत कोणताही लक्षणीय बदल झाला नसल्याचे भयाण वास्तव यानिमित्ताने समोर आलंय. ऑक्सफॅमने म्हटले आहे की, २०२४ मध्ये आशियातील अब्जाधीशांच्या संपत्तीत २९९ अब्ज अमेरिकन डॉलरची वाढ झाली. आतापासून एका दशकात किमान ५ ट्रिलियनेअर्स होतील असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.
एका वर्षात २०४ नवीन अब्जाधीश
२०२४ मध्ये अब्जाधीशांच्या यादीत २०४ नवीन लोक सामील झाले. दर आठवड्याला सरासरी ४ नावे त्यात सहभागी होत होती. या वर्षी आशियातील केवळ ४१ नवीन अब्जाधीश या यादीत सामील झाले आहेत. ऑक्सफॅमने म्हटले आहे की 'ग्लोबल नॉर्थ' मधील सर्वात श्रीमंत एक टक्का लोकांनी २०२३ मध्ये 'ग्लोबल साउथ' कडून प्रति तास ३ कोटी डॉलर्स कमावले.
६० टक्के मालमत्ता मेहनतीशिवाय मिळतेय
अहवालात म्हटले आहे की अब्जाधीशांच्या संपत्तीपैकी ६० टक्के संपत्ती आता वारसा, मक्तेदारी किंवा क्रॉनी रिलेशनशिपमधून मिळत आहे. म्हणजे काहीही मेहनत न करता अब्जाधीशांची संपत्ती वाढत आहे. गरीब-श्रीमंत दरी वाढत जाणे जगासाठी गंभीर इशारा आहे. ही विषमता दूर करण्यासाठी या गटाने जगभरातील सरकारांना आवाहन केलं आहे. यासाठी सर्वात श्रीमंत लोकांवर जास्त कर लादण्याचे मागणी केली आहे. २०२४ मध्ये अब्जाधीशांची संपत्ती दररोज सरासरी ५.७ अब्ज डॉलरच्या दराने वाढली, तर अब्जाधीशांची संख्या २,५६५ वरून २०२३ मध्ये २,७६९ पर्यंत वाढली.
जगाला थेट इशारा
जगभरातील मुठभर लोकांकडे अमाप संपत्ती एकवटली आहे. आता अब्जाधीशांच्या संपत्तीपैकी ३६ टक्के संपत्ती वारशाने मिळाली आहे. अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स सारख्या ‘ग्लोबल नॉर्थ’ देशांतील सर्वात श्रीमंत एक टक्का लोकांना २०२३ मध्ये ‘ग्लोबल साउथ’ देशांकडून प्रति तास ३ कोटी डॉलर्स आर्थिक व्यवस्थेद्वारे मिळत होते. जागतिक बँकेच्या आकडेवारीचा हवाला देऊन अहवालात असे म्हटले आहे की, १९९० पासून प्रतिदिन ६.८५ डॉलर्सपेक्षा कमी कमावणाऱ्या लोकांच्या संख्येत फारसा बदल झालेला नाही.
७० टक्के मालमत्ता फक्त एका बाजूला
या अभ्यासात म्हटले आहे की, 'ग्लोबल नॉर्थ' देशांकडे जागतिक संपत्तीच्या ६९ टक्के, जगातील अब्जाधीशांच्या संपत्तीपैकी ७७ टक्के संपत्ती आहे, तर जागतिक लोकसंख्येमध्ये त्यांचा वाटा केवळ २१ टक्के आहे. शिक्षकांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी, औषधे खरेदी करण्यासाठी आणि चांगल्या नोकऱ्या निर्माण करण्यासाठी प्रत्येक देशात नितांत गरज असलेला पैसा 'अतिश्रीमंतांच्या' बँक खात्यात टाकला जात आहे. हे केवळ अर्थव्यवस्थेसाठीच नाही तर मानवतेसाठीही वाईट आहे.