Join us  

शेअर बाजारात कोट्यवधींचा घोटाळा; श्वेतपत्रिका आणण्याची काँग्रेसची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 6:48 AM

राष्ट्रीय शेअर बाजार चालवणारा अदृश्य बाबा नेमका कोण आहे, ज्यांच्या इशाऱ्यावर चित्रा रामकृष्ण या गेली २० वर्षे  बाजारामध्ये अनेक बाबींमध्ये मार्गदर्शन घेत होत्या.

मुंबई : तब्बल ४ ट्रिलियन डॉलर बाजार भांडवल असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांनी एका साधूच्या सांगण्यावरून बाजाराचा कारभार चालवला. गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय शेअर बाजारात कोट्यवधींचा घोटाळा झाला असून, याप्रकरणी केंद्रीय अर्थमंत्री, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन धारण केले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने शेअर बाजाराच्या कामकाजावर श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

राष्ट्रीय शेअर बाजार चालवणारा अदृश्य बाबा नेमका कोण आहे, ज्यांच्या इशाऱ्यावर चित्रा रामकृष्ण या गेली २० वर्षे  बाजारामध्ये अनेक बाबींमध्ये मार्गदर्शन घेत होत्या. मुख्य धोरणात्मक सल्लागार म्हणून आनंद सुब्रमण्यम यांची नियुक्ती ही नियमांना धरून नाही. सुब्रमण्यम यांना ५ कोटी रुपयांचे वेतन देण्यात आले. यासह अनेक बाबी सेबीच्या आदेशात समोर आल्या आहेत. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा असल्याचा दावा, काँग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी केला आहे.

मुळात सेबीने जो आदेश काढला आहे तो अपूर्ण असून, डोळ्यासमोर दिसणाऱ्या गोष्टींपेक्षा काहीतरी अधिक यामध्ये आहे. यामुळे या प्रकरणात सेबीसह अन्य तपास यंत्रणांच्या मदतीने तपास करण्याची गरज आहे. यासाठी केंद्रीय अर्थमंत्री आणि पंतप्रधान कार्यालयाने तत्काळ आदेश देण्याची आवश्यकता असतानाही कोणतीही पावले उचलण्यात येत नसल्याने अनेक शंका उपस्थित होत आहेत, असे काँग्रेसने म्हटले आहे.

प्रकरण दडपण्याचा प्रयत्नएनएसईमध्ये घोटाळा समोर आल्यानंतरही एनएसईने चित्रा रामकृष्ण आणि सुब्रमण्यम यांच्यासह इतरांना राजीनामा देण्यास परवानगी दिली हे सेबीला आश्चर्यकारक वाटते आहे. चित्रा यांनी जरी राजीनामा दिला  तरीही त्यांची कारवाईपासून सुटका होणार नसल्याचे सेबीने म्हटले आहे. घोटाळा झाल्यानंतरही चित्रा रामकृष्ण आणि सुब्रमण्यम यांच्या लॅपटॉपची ई-कचरा म्हणून विल्हेवाट लावण्यास राष्ट्रीय शेअर बाजाराने परवानगी दिली.  त्यामुळे या प्रकरणात सर्वांचे हात गुंतले असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :शेअर बाजार