मुंबई : साधूच्या सांगण्यावरून शेअर बाजारात निर्णय घेणाऱ्या एनएसईच्या माजी अध्यक्षा चित्रा रामकृष्ण यांच्यावर सेबीकडून कारवाई करण्याआधीच काही दिवस अगोदर एनएसईच्या समभागांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली होती. एनएसईच्या समभाग ट्रान्स्फर डेटामध्ये ही माहिती दिसून आली असून, यात मोठा घोटाळा झाला असल्याचा संशय अधिकाऱ्यांना आहे.
एनएसईच्या संकेतस्थळावर असलेल्या डेटानुसार, एनएसईच्या समभागांमध्ये २०९ व्यवहार झाले. यातील तब्बल एक तृतीयांश विदेशी भागधारकांशी जोडलेले आहेत. असे दिसते की, या परदेशी भागधारकांनी एनएसईचे समभाग भागधारकांना विकले. विदेशी गुंतवणूकदारांनी एकूण ११.६१ लाख समभाग १,६५० आणि २,८०० रुपयांच्या किमतीमध्ये विकले. याचा थेट संबंध शेअर बाजारातील कोट्यवधींच्या को-लोकेशन घोटाळ्याशी असण्याचा संशय आहे.
सरकारचे केवळ लक्ष
- एनएसई घोटाळ्यात चित्रा यांच्या कारवाईबाबत सरकार सध्या लक्ष ठेवून असून, संबंधितांविरोधात कोणती पावले उचलणार याबाबत मात्र बोलण्यास केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नकार दिला आहे.
- दोषींना शिक्षा करण्याच्या किंवा त्यांच्यावर कारवाई करण्याच्या बाबतीत पुरेशी पावले उचलली गेली की नाही याबद्दल मला काहीही म्हणायचे नाही.
- आमचे या प्रकरणाकडे लक्ष आहे. मात्र, सध्या यावर भाष्य करण्याच्या स्थितीत नाही, असे सीतारामन यांनी म्हटले आहे.