किरण मुझुमदार शॉ (Kiran Mazumdar Shaw) यांना आज कोणत्याही वेगळ्या परिचयाची गरज नाही. बायोकॉनच्या (Biocon) संस्थापक किरण यांची भारतातील टॉप बिझनेस टायकूनमध्ये गणना केली जाते. आपल्या मेहनतीच्या आणि इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी स्वत:ला सिद्ध केलंय. बहुतांश लोक किरण मुझुमदार शॉ यांना ओळखतात. परंतु बायोकॉनला यशाच्या शिखरावर पोहोचवण्यासाठी केलेल्या संघर्षाबद्दल मात्र फार कमी लोकांना माहिती आहे. फोर्ब्सनं किरण यांना जगातील सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीतही स्थान दिलं आहे. फोर्ब्सच्या मते, त्यांची एकूण संपत्ती (Kiran Mazumdar Shaw Net worth) २३० कोटी डॉलर्स आहे.
किरण मुझुमदार शॉ यांचा जन्म २३ मार्च १९५२ रोजी कर्नाटकातील बंगळुरूत झाला. त्यांनी बंगळुरू विद्यापीठातून १९७३ मध्ये B.Sc (जूलॉजी ऑनर्स) पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी मेलबर्न युनिव्हर्सिटी ऑस्ट्रेलियाच्या व्हॅलेरेट कॉलेजमधून 'माल्टिंग आणि ब्रूइंग'मध्ये उच्च शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी चार वर्षे कार्लटन आणि युनायटेड ब्रुअरीजमध्ये प्रशिक्षणार्थी ब्रुअर म्हणून काम केलं.
यानंतर त्यांनी कोलकात्यातील ज्युपिटर ब्रेवरीज लिमिटेड येथे तांत्रिक सल्लागार म्हणूनही काम केलं. किरण यांनी बंगळुरू किंवा दिल्लीत नोकरी करण्याचा विचार केला. दोन्ही कंपन्यांमध्ये मद्य तयार करण्याचं काम केवळ पुरुष करतात, महिला नाही, असं सांगत त्यांना नकार देण्यात आला. त्या काळी भारतातील मद्याच्या कंपनीत एका महिलेला ब्रू-मास्टर म्हणून नोकरी मिळू शकत नव्हती.
आयर्लंडमध्ये केली नोकरी
दिल्ली आणि बंगळुरूमध्ये ब्रूमास्टर म्हणून नोकरी शोधत असताना, किरण यांची आयरिश उद्योजक लेस ऑचिनक्लोस यांच्याशी भेट झाली. त्यांनी किरण यांना व्यवसाय सुरू करण्याचा सल्ला दिला. परंतु तो सल्ला त्यांना आवडला नाही. ऑचिन्क्सलॉस यांनी त्यांना आयर्लंडमधील बायोकॉन बायो केमिकल्समध्ये काम शिकण्याची ऑफर दिली. जर त्यांना व्यवसाय आवडला नाही तर सहा महिन्यांत त्यांना कुठेतरी आवडीची नोकरी मिळवून देऊ असं त्यांनी सांगितलं. आयर्लंडमधील बायोकॉन बायो केमिकल्स लिमिटेडमध्ये ट्रेनी मॅनेजर म्हणून त्यांनी काम सुरू केलं.
गॅरेजमधून कंपनीची सुरूवात
बायोकॉनमध्ये काही महिने काम केल्यानंतर किरण भारतात परतल्या. यावेळी त्यांनी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांना भारतात बायोटेक्नॉलॉजीशी संबंधित व्यवसाय करायचा होता. इथेही सुरूवातीला त्यांना अडचण आली. त्या काळात बायोटेक्नॉलॉजी हा पूर्णपणे नवीन विषय होता. दुसरं म्हणजे, एखादी स्त्रीला व्यवसाय यश मिळेल का नाही याबाबतही शंका व्यक्त करण्यात येत होती. या कारणांमुळे त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज मिळू शकलं नाही. १९७८ मध्ये, त्यांनी आयर्लंडच्या बायोकॉन बायोकेमिकल्स लिमिटेडच्या सहकार्यानं त्यांची कंपनी स्थापन केली. त्यांनी एका गॅरेजमध्ये अवघ्या १० हजार रुपयांमध्ये आपली कंपनी सुरू केली.
व्यवसायाला यश
किरण मुझुमदार शॉ यांच्या कंपनीनं सर्वप्रथम पपईच्या रसापासून एन्झाइम्स बनवण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या काळातच त्यांच्या व्यवसायाला गती मिळाली. बायोकॉननं आपली उत्पादनं अमेरिका आणि अनेक युरोपीय देशांमध्ये निर्यात करण्यास सुरुवात केली. यानंतर बायोकॉननं इसिंग्लासचं एक्स्ट्रॅक्शन सुरू केलं. याचा वापर बिअर साफ करण्यासाठी केला जातो. यानंतर किरण यांनी मागे वळून पाहिलं नाही. आज बायोकॉन ही भारतातील सर्वात मोठी लिस्टेड बायोफार्मास्युटिकल कंपनी आहे. बायोकॉनचं व्हॅल्युएशन सुमारे ३० हजार कोटी रुपये आहे.