Join us  

Bisleri, Kinley… जाणून घ्या, भारतात बाटलीबंद पाण्याच्या किती मोठा आहे व्यवसाय?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 9:16 AM

वर्षाला हजारो कोटींच्या वर आहे उलाढाल. वाचा कसा होता आजवरचा बिल्सेरीचा प्रवास.

बिस्लेरी, किन्ले, एक्वाफिना आणि रेल नीर... भारतात बाटलीबंद पाण्याची मोठी बाजारपेठ आहे. मिनरल वॉटर हे देशातील सर्वाधिक विकलं जाणारं पाणी आहे. त्यात मोठ्या मिनरल्स असतात. हे नेहमीच्या पाण्यापेक्षा वेगळं असतं कारण त्यात कॅल्शियम कार्बोनेट, मॅग्नेशियम सल्फेट, पोटॅशियम आणि सोडियम सल्फेट असतं. बिस्लेरी ही भारतातील बाटलीबंद पाण्याच्या व्यवसायातील सर्वात मोठी कंपनी आहे. बिस्लेरीच्या पाण्याच्या बाटल्या विमानतळापासून शहरांमधील सामान्य स्टोअरमध्ये विकल्या जातात. देशात बाटलीबंद पाण्याच्या बाजारात इतरही अनेक कंपन्या आहेत.

२०२१ मध्ये भारतात बाटलीबंद पाण्याची बाजारपेठ सुमारे २० हजार कोटी रुपयांची होती. यामध्ये बिसलरीचा वाटा सुमारे ४ ते ५ हजार कोटी रुपयांचा आहे. बिसलरीचा संघटित बाजारपेठेत ३२ टक्के वाटा आहे. या तुलनेत किनले आणि एक्वाफिना सारखे ब्रँड खूप मागे आहेत. जलप्रदूषण आणि त्याच्या वाढत्या आरोग्यविषयक चिंतांमुळे भारतातील मिनरल वॉटर व्यवसायाचा आकार वाढला आहे. त्यामुळे बाटलीबंद पाण्याचा वापर वाढलाय. एक लिटरची बाटली, दोन लिटरची बाटली, 500 मिलीची बाटली आणि 250 मिलीची बाटली अशा चार प्रकारात भारतात मिनरल वॉटर उपलब्ध आहे.

इटलीच्या व्यावसायिकानं केली होती स्थापनाआता जर देशातील सर्वात मोठी पॅकेज्ड वॉटर बॉटल कंपनी बिस्लेरीबद्दल सांगायचं झालं तर त्यांचे तब्बल १२२ ऑपरेशनल प्लांट आहेत. याशिवाय कंपनीकडे ४५०० डिस्ट्रिब्युटर्स आणि ५ हजार डिस्ट्रिब्युशन ट्रक आहेत. बिस्लेरीचा इतिहास पाहिला तर ती मूळची इटालियन कंपनी होती आणि तिचा व्यवसाय पाणी विक्रीचा नसून औषधं विकण्याचा होता. ही एक फार्मास्युटिकल कंपनी होती, जी प्रामुख्याने मलेरियाचं औषध विकत होती. कंपनीची स्थापना इटालियन उद्योगपती फेलिस बिस्लेरी यांनी केली होती. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे फॅमिली डॉक्टर रॉसी यांनी बिस्लेरीचा व्यवसाय हाती घेतला आणि ही कंपनी भारतात आणण्याचं श्रेयही त्यांना जातं.

ठाण्यात पहिला प्रकल्प६० च्या दशकात जेव्हा कंपनीनं भारतात प्रवेश केला तेव्हा त्या वेळी पॅकेज्ड वॉटर विकण्याचा विचार करणं देखील वेडेपणासारखं होते. कारण त्या वेळी बाटलीबंद पाणी घेऊन ते कोण पिणार असं लोकांन वाटलं असावं. पण रॉसी यांनी आपल्या योजनेवर ठाम राहून काम सुरू ठेवलं. १९६५ मध्ये त्यांनी मुंबईच्या नजीक असलेल्या ठाण्यात 'बिसलेरी वॉटर प्लांट' स्थापन केला. त्यावेळी मुंबईत काचेच्या बाटल्यांमध्ये पाणी विकणे सुरू होते. हे बिस्लेरी बबली आणि बिसलेरी स्टिल नावाने बाजारात आणलं गेलं.

रमेश चौहानांनी बनवला मोठा ब्रँड१९६९ मध्ये, पार्लेने बिस्लेरी (इंडिया) लिमिटेड विकत घेतली आणि 'बिस्लेरी' या ब्रँड नावानं काचेच्या बाटल्यांमधील पाणी विकणे सुरू ठेवले. जसजसा व्यवसाय वाढत गेला तसतसे पार्ले पीव्हीसी नॉन रिटर्न बाटल्या आणि पीईटी कंटेनर्सकडे वळले. १९९५ मध्ये रमेश चौहान यांनी बिस्लेरी हे ब्रँड सोडा ब्रँडमध्ये रूपांतरित करू या उद्देशाने विकत घेतले आणि त्यांनी तसं केलंही. परंतु 'बबली' आणि 'स्टिल' हे दोन बाटलीबंद पाण्याचे ब्रँड बंद केले नाहीत. मग हळूहळू बिस्लेरीनं भारतीय बाजारपेठेत आपले पाय रोवण्यास सुरुवात केली आणि आज ती देशातील सर्वात मोठी बाटलीबंद पाण्याची कंपनी आहे.

टॅग्स :पाणीव्यवसाय