मुंबई - बिटकॉइन या व्हर्चुअल करन्सीची सध्या बाजारामध्ये बरीच चलती आहे. वॉल स्ट्रीटपासून अनेक फायनान्शिअल मार्केटसमध्ये बिटकॉइनबद्दल एक आकर्षण निर्माण झाले आहे. बॉलिवूडचे शेहनशहा अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबानेही बिटकॉइनमध्ये गुंतवणूक केली होती. त्याचा मोठा फायदा बच्चन कुटुंबाला झाला आहे. इकोनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार अडीचवर्षांपूर्वी बच्चन कुटुंबाने बिटकॉइनमध्ये 1.6 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. त्याचे मुल्य आता 110 कोटी रुपये झाले आहे.
2015 मध्ये अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांनी मेरीडियन टेक पीटीईमध्ये 1.6 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. मेरीडियन टेक ही सिंगापूरची कंपनी असून, वेंकट श्रीनिवास मीनावल्ली यांनी या कंपनीची स्थापना केली होती. अनेक छोटया टेक्नोलॉजी आणि फायनान्शिअल टेक्नोक्लॉजी कंपन्यांप्रमाणे मेरीडियनबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.
मागच्या आठवडयात मेरीडियनच्या झिद्दू.कॉम या कंपनीला लाँगफिन कॉर्पने विकत घेतले. लाँगफिन कॉर्पची अमेरिकन शेअर बाजार नॅसडॅकमध्ये नोंदणी झाल्यानंतर दोन दिवसांनी हा व्यवहार झाला. लाँगफिनच्या शेअर्सचे मुल्य बुधवार ते सोमवार दरम्यान 1 हजार टक्क्यांनी वाढले. शुक्रवारी जेव्हा झिद्दू.कॉम खरेदी करण्याचा करार झाला तेव्हा शेअर्सचे मुल्य 2500 टक्क्यांनी वाढले.
कसे खरेदी करता येतात बिटकॉइनबिटकॉइन एक व्हर्चुअल करन्सी आहे. कागदोपत्री कोणतेही व्यवहार नसतात. व्हर्चुअल करन्सी खरेदी करण्यासाठी याचा एक खास अॅप डाऊनलोड करावा लागतो. त्याद्वारे आपल्या खात्यातले पैसे वर्ग केल्यास बिटकॉइन खरेदी अथवा विक्रीही करता येते. आरबीआयने बिटकॉइनमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी अद्याप मान्यता दिली गेली नसल्याचं स्पष्ट केलं आहे. अशा परिस्थितीत व्हर्चुअल करन्सीत ट्रेड करणं धोकादायक ठरु शकतं. गेल्या आठवड्यात एका बिटकॉईनचे मूल्य तब्बल 11 हजार डॉलर्सवर पोहोचले होते. ज्यामुळे सर्वांनाच धक्का दिला होता. आज हे मूल्य 12 हजार डॉलर्सवर पोहोचलं आहे.
बिटकॉइनद्वारे रिअल इस्टेटमध्ये ब्लॅक मनी?रिअल इस्टेट व्यवसायाला बिट कॉईनच्या व्हर्चुअल करन्सीने नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न सुरू झाल्याची माहिती अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांकडून हाती आली आहे. अनिवासी भारतीयांची यात मदत घेतली जात आहे. नोटाबंदीनंतर थंडावलेल्या व्यवसायाला बिटकॉईनच्या माध्यमातून पुन्हा बहर आण्याचे प्रयत्न सुरू झाले तर या व्यवसायावरील मंदीचे सावट ब-यापैकी दूर होईल, असा विचार करून या क्षेत्रात मोठया व्यावसायिकांनी काही प्रयत्न सुरू केल्याचा सुगावा लागताच, सक्त वसुली संचलनालय (ईडी)ने चौकशी सुरू केली. विशेष म्हणजे बिटकॉईनचा वापराचे केंद्र गुजरातमध्ये अहमदाबाद येथे असल्याचे समजताच ईडीने दोन ठिकाणी धाडी घातल्याची माहितीही हाती आली आहे.