Join us

ट्रम्प यांच्या टीकेनंतर बिटकॉइनची घसरण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 4:26 AM

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गत आठवड्यात बिटकॉइनवर केलेल्या टीकेनंतर बिटकॉइनचे मूल्य पुन्हा एकदा घसरले आहे.

सिंगापूर : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गत आठवड्यात बिटकॉइनवर केलेल्या टीकेनंतर बिटकॉइनचे मूल्य पुन्हा एकदा घसरले आहे. सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सीचे बिटकॉइनचे मूल्य हाँगकाँगमध्ये शुक्रवारी १०,०२८.५५ डॉलर होते. त्यानंतर, त्यात १५ टक्के घसरण होऊन एका बिटकॉइनचे मूल्य ९,९८० डॉलर इतके झाले.ट्रम्प यांनी मागील आठवड्यात बिटकॉइनवर कठोर शब्दांत टीका केली होती. ट्रम्प म्हणाले होते की, आभासी चलनावर (क्रिप्टोकरन्सी) आपला विश्वास नाही. जे लोक या व्यापारात प्रवेश करू इच्छितात,त्यांनी बँकिंग नियमाचे पालन करायला हवे. मी बिटकॉइन किंवा आभासी चलनाचा समर्थक नाही. हे धन नाही. याचे मूल्य सातत्याने कमी, जास्त होते. याचा कोणताही ठोस आधार नाही. ते डिजिटल स्वरूपात असल्याने त्याला शोधता येत नाही. यामुळे बेकायदेशीर हालचाली वाढू शकतात.ट्रम्प यांच्या विधानानंतर बिटकॉइनच्या मूल्यात सुरुवातीला ६.८ टक्क्यांची वाढ झाली. मात्र, त्यानंतर यात घसरण झाल्याचे दिसून येत आहे. टोरंटोच्या मार्केटमधील तज्ज्ञ अल्फोन्सो इस्पारजा यांनी म्हटले आहे की, ट्रम्प यांच्या बोलण्याचा अर्थ असा आहे की, बिटकॉइन ८,००० डॉलरपर्यंत घसरू शकते. (वृत्तसंस्था)>काय आहे बिटकॉइन?चलनांचे अनेक प्रकार आहेत, जसे की, भारतात रुपया, अमेरिकेत डॉलर, ब्रिटनमध्ये पौंड, युरोपमध्ये युरो आदी. हे सर्व चलन कागदावरील ठरावीक प्रिंटच्या माध्यमात असते, ते खिशात बाळगू शकतो. जगात कुठेही गेलो, तरी तेथे चलनाचा वापर करावा लागतो. जगभर डिजिटल पेमेंट वाढत असल्याने बिटकॉइन या डिजिटल चलनाचे पर्व सुरू झाले. आपण ते पाहू शकत नाही. ही एक विश्वव्यापी क्रिप्टोकरन्सी (आभासी चलन) आहे व डिजिटल पेमेंट प्रणाली आहे. जानेवारी, २००९ मध्ये प्रथमच सातोशी नाकामोतो यांनी ते जारी केले.

टॅग्स :बिटकॉइन