Join us

ट्रम्प यांच्या एका वक्तव्याने बिटकॉइनने रचला इतिहास! किंमत पहिल्यांदाच १ लाख डॉलर्सच्या पुढे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 16:27 IST

Bitcoin Tody Price : अमेरिकेच्या अध्यक्षपदी विराजमान होणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील तेल साठ्याप्रमाणे बिटकॉइनचा साठा तयार करण्याच्या योजनेवर विचार केला जाऊ शकतो, असे संकेत दिले आहेत.

Bitcoin Tody Price : नवीन वर्षात डोनाल्ड ट्रम्प अमेरिकच्या अध्यक्षपदावर पुन्हा एकदा विराजमान होणार आहेत. मात्र, ते येण्याआधीच त्यांचा प्रभाव जगभर पाहायला मिळत आहे. डॉलर मजबूत झाला असून मंदी असलेल्या आयटी क्षेत्रात उत्साह परतला आहे. आजचा दिवस तर क्रिप्टोकरन्सी मार्केटमधला ऐतिहासिक दिवस होता. जगातील सर्वात मोठ्या आणि लोकप्रिय क्रिप्टोकरन्सीबिटकॉइनने प्रथमच १ लाख डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. सुरुवातीच्या व्यापारात, बिटकॉइनची किंमत १,०६,००० डॉलरपर्यंत पोहोचली. भारतीय रुपयांमध्ये अंदाजे ९० लाख रुपयांच्या समतुल्य आहे. या अभूतपूर्व वाढीनंतर बिटकॉइनचे मार्केट कॅप २.१ ट्रिलियन डॉलरवर पोहोचले.

ट्रम्प यांच्या विधानाची जादूबिटकॉइनच्या किमतीत या वाढीचे मुख्य कारण अमेरिकेच्या अध्यक्षपदावर बसणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांचे वक्तव्य असल्याचे मानले जात आहे. किंबहुना, अमेरिकेतील तेलाच्या साठ्याप्रमाणे बिटकॉइनचा साठा निर्माण करण्याच्या योजनेवर विचार केला जाऊ शकतो, असे संकेत त्यांनी दिले आहेत. क्रिप्टोकरन्सीला ट्रम्प यांनी दिलेले समर्थन बिटकॉइन आणि इतर डिजिटल चलनांना नवीन उंचीवर नेले आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी अमेरिकेला जगाची ‘क्रिप्टो कॅपिटल’ बनवण्याचे वचन दिले होते. ५ नोव्हेंबर रोजी अध्यक्षीय निवडणुकीचा निकाल लागल्यापासून, बिटकॉइनमध्ये सुमारे ५०% वाढ झाली आहे.

इतर क्रिप्टोकरन्सीतही वाढबिटकॉइनसोबतच इतर क्रिप्टोकरन्सीच्या किमतीही वाढल्या आहेत. Ethereum ची किंमत सुमारे ३% वाढून ४,०१४ डॉलर झाली. क्रिप्टोकरन्सी मार्केटचे एकूण मार्केट कॅप आता ३.८ ट्रिलियन आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जर हा ट्रेंड असाच चालू राहिला तर २०२५ पर्यंत बिटकॉइन २००,००० डॉलरचा टप्पा गाठू शकेल.

भविष्यातील शक्यता काय आहे?बिटकॉइनची ही ऐतिहासिक वाढ क्रिप्टोकरन्सी मार्केटसाठी महत्त्वाचा टप्पा ठरू शकते. जगभरातील डिजिटल चलनांची वाढती स्वीकृती आणि सरकारी पाठबळ यामुळे भविष्यात ही बाजारपेठ अधिक मजबूत होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. बिटकॉइनने ५ डिसेंबर रोजी प्रथम १ लाख डॉलरचा टप्पा ओलांडला. नवीन वर्षात त्यात आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे. IG विश्लेषक टोनी सायकॅमोर यांच्या मते, "बाजारातील ट्रेंड पाहता बिटकॉइन ११०,००० डॉलरपर्यंत पोहोचू शकतो."

सूचना : यामध्ये बिटकॉइनची माहिती देण्यात आली आहे. हा कुठल्याही प्रकारे गुंतवणुकीचा सल्ला नाही. पैसे गुंतवण्यापूर्वी नेहमी तज्ञांचा सल्ला घ्या.

टॅग्स :क्रिप्टोकरन्सीबिटकॉइनडोनाल्ड ट्रम्प