Join us

बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या वतीने जुलैमध्ये अमेरिकेत "बिझकॉन"

By admin | Published: May 11, 2017 5:57 PM

येत्या जुलै महिन्यात डेट्रॉईट महाराष्ट्र मंडळातर्फे ग्रॅण्ड रॅपिडस येथे होणार्या 18 व्या बीएमएम अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला एक विशेष बिझिनेस कॉन्फरन्स (बिझकॉन) आयोजित करण्यात आली आहे

ऑनलाइन लोकमत

मुंबई : मायभूमी आणि मायभाषा-संस्कृतीशी असलेले बंध भक्कम करण्याच्या उद्देशाने उत्तर अमेरिकेत स्थलांतरीत झालेल्या मराठी माणसांनी स्थापन केलेल्या बृहन्महाराष्ट्र मंडळाने बदलत्या काळाच्या ओघात आपली दिशा बदलली असून आता मायदेशातल्या नव-उद्योजकांना उत्तर अमेरिकेतील उद्योगविश्वाशी जोडण्यासाठी पुढाकार घेतला आहे.येत्या जुलै महिन्यात डेट्रॉईट महाराष्ट्र मंडळातर्फे ग्रॅण्ड रॅपिडस येथे होणार्या 18 व्या बीएमएम अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला एक विशेष बिझिनेस कॉन्फरन्स (बिझकॉन) आयोजित करण्यात आली असून उद्योजक, उद्योग-व्यापारी संस्थांचे प्रतिनिधी आणि व्यावसायिकांना परस्पर संपर्कासह बदलत्या वातावरणाला पूरक अशी नवी तंत्रे आत्मसात करण्याची संधी मिळणार आहे.दिनांक 6 जुलै रोजी अमेरिकेच्या मिशीगन प्रांतातील ग्रॅण्ड रॅपिडस येथे होणार्या या पूर्ण दिवसीय चर्चासत्रासाठी नोंदणी सुरू असून महाराष्ट्रातील उद्योजकांना यात सहभागी होऊन उत्तर अमेरिकेतील समव्यावसायिक, भांडवलदारांशी संपर्काची संधी मिळणार आहे.‘इन्टेलिजन्ट मोबिलिटी’हे या बिझकॉनचे प्रमुख सूत्र असून इंटरनेटमुळे वाढते संपर्कजाळे, जगभरात वाढणारे नागरीकरण, त्यातून होणारे सामाजिक बदल आणि या साऱ्याचा उद्योगातील संधी-संकटे व शक्यतांवर होणारा परिणाम यावर या परिषदेत अनुभवकथन व विचारमंथन होईल. त्यासाठी उपस्थित तज्ञांमध्ये अमेरिकेतील उद्योजक, तेथील विद्यापीठे आणि संशोधन संस्थांमधील अभ्यासक, शासनसंस्थांचे पदाधिकारी तसेच वित्तीय संस्थांचे प्रतिनिधी यांचा सहभाग असेल.हे सत्र तीन भागांमध्ये विभागण्यात आले आहे.‘बीटूबी’ या भागात महाराष्ट्रातील उद्योजकांना उत्तर अमेरिकेतील संबंधीत कंपन्या-उद्योगांशी थेट संपर्क तसेच नेटवर्किंगची संधी मिळेल. त्यातून भविष्यातील ‘पार्टनरशीप्स’ची पायाभरणी व्हावी अशी अपेक्षा आहे. अमेरिकन भांडवलदारांकडून भांडवलपुरवठ्याच्या शक्यता पडताळणे, संभाव्य भागीदारीच्या चर्चा याला या सत्रात उत्तेजन दिले जाईल.‘बीएमएम शिफ्टिंग गिअर’ या सत्रात आपला सद्य उद्योग- व्यवसाय अगर नोकरीत बदल शोधणाऱ्यांना एका मंचावर आणण्याचा प्रयत्न असेल. अशा पध्दतीने ‘बदला’चे नियोजन करून तो यशस्वीपणे अंमलात आणणारे अमेरिकन आणि भारतीय उद्योजक-व्यावसायिक या सत्रात मार्गदर्शन करतील. या प्रवासासाठी अत्यावश्यक तंत्र-मंत्राचे प्रशिक्षण देणारी चर्चासत्रे हे या सत्राचे वैशिष्ट्य असेल.

तंत्रज्ञानाशी निगडीत असणारी नवनिर्निती आणि नवोद्योजक यांना एका मंचावर आणून त्यांच्या वाटचालीला दिशा, भांडवल तसेच संधी पुरवणारे तिसरे सत्र ‘ आन्त्रप्रुनर एम्पॉवर्ड’ या नावाने आयोजित करण्यात आले असून त्यात बिझिनेस मॉडेल्स, भांडवल उभारणी, विपणन अशा सर्व विषयांवर चर्चा-मार्गदर्शन केले जाईल.‘पर्सिसण्ट’चे संस्थापक आनंद देशपांडे, एलजी केमिकल्सचे प्रभाकर पाटील, व्हिस्टॉनचे प्रमुख सचिन लवंदे यांच्यासह अमेरिकेतील मान्यवर या सत्रांमध्ये मार्गदर्शन करतील. त्यामध्ये अमेरिकन सेंटर फॉर मोबिलिटीचे अध्यक्ष जॉन मॅडॉक्स, इंटरेटेकचे संचालक राल्फ बकिंगहॅम, ख्यातनाम लेखक रॉबर्ट पॅसिक, इओएस या प्रणालीचे तज्ञ केवीन सबॉस्की, सेनसईच्या संचालक डायाना वॉंग, मिशिगन स्मॉल बिझिनेस डेव्हलपमेंट सेंटरचे संचालक कीथ ब्रॉफी आदिंचा समावेश आहे.बीएमएमचे अठरावे अधिवेशन सात जुलैपासून सुरू होत असून त्याच्या पूर्वसंध्येला आयोजित या बिझकॉनसाठीची नोंदणी आणि अधिक माहितीhttps://www.bmm2017.org/index.php/business-conference  येथे उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी बीएमएमच्या प्रतिनिधी मंडळातील बिझकॉनचे संयोजक भूषण कुलकर्णी (bhushan.kulkarni@bmm2017.org) यांच्याशी संपर्क साधता येईल.