मुंबई - विविध उद्योग समुहांकडून मिळणारा निवडणूक निधी हा विविध राजकीय पक्षांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असतो. दरम्यान, देशातील प्रतिष्ठित उद्योग समूह असलेल्या टाटा उद्योग समुहानेही 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांना भरभक्कम निवडणूक निधी दिला आहे. एका अंदाजानुसार टाटा समुहाने एकूण 500 ते 600 कोटींचा निवडणूक निधी दिला असून, त्यापैकी सर्वाधिक निधी हा सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला देण्यात आला आहे.
राजकीय पक्षांना निवडणूक निधी देण्यासाठी टाटा समुहाने प्रोग्रेसिव्ह इलेक्टोरल ट्रस्टची स्थापना केली आहे. या ट्रस्टच्या माध्यमातून विविध राजकीय पक्षांना देणगी देण्यात येते. बिझनेस स्टँडर्डने दिलेल्या वृत्तानुसार 2019 च्या लोकसभा निवडणुकीत टाटा समुहाने एकूण 500 ते 600 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. 2014 मध्ये टाटा समुहाने केवळ 25 कोटी रुपये निवडणूक निधी म्हणून दिले होते. मात्र यावर्षी टाटा समुहाच्या निवडणूक निधीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
टाटा समुहाने या निधीमधून सर्वाधिक देणगी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला देण्यात आली आहे. टाटा समुहाकडून सुमारे 300 ते 350 कोटी रुपयांची देणगी भाजपाला मिळाली आहे. तर काँग्रेसला केवळ 50 कोटी रुपयांची देणगी देण्याच आली आहे. उर्वरित 150 ते 200 कोटी रुपयांमधून तृणमूल काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, सीपीआयएम, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच इतर पक्षांना देणगी देण्यात आली आहे.
आमच्या ट्रस्टकडून राजकीय पक्षांना त्यांच्या सदस्यसंख्येनुसार देणगी दिली जाते. त्यामुळे अधिक सदस्य असलेल्या भाजपाला अधिक देणगी दिली गेली, असे टाटाच्या प्रोग्रेसिव्ह इलेक्टोरल ट्रस्टने सांगितले आहे. टाटा समुहाच्या सर्व संलग्न कंपन्या प्रोग्रेसिव्ह इलेक्टोरल ट्रस्टमध्ये देणगी देत असतात. त्यानंतर ट्रस्टच्या वतीने हा निधी वितरित केला जातो.
टाटा समुहाची सर्वाधिक देणगी भाजपाला; एकूण ६०० कोटींचा निवडणूक निधी
देशातील प्रतिष्ठित उद्योग समूह असलेल्या टाटा उद्योग समुहानेही 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांना भरभक्कम निवडणूक निधी दिला आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 06:09 PM2019-04-30T18:09:02+5:302019-04-30T18:09:38+5:30