Join us

जीएसटी हा शतकातील सर्वात मोठा मूर्खपणा, भाजपा खासदाराचा घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 8:43 PM

जीएसटी करप्रणाली लागू करताना केंद्र सरकारने जीएसटी ही करप्रणालीमधील सर्वात मोठी सुधारणा असल्याचा दावा केला होता. मात्र प्रत्यक्ष व्यवहारात या करप्रणालीची अंमलबजावणी करताना अनेक अडचणी येत आहेत.

नवी दिल्ली - देशात जीएसटी करप्रणाली लागू होऊन आता अडीच वर्षे होत आली आहेत. ही करप्रणाली लागू करताना केंद्र सरकारनेजीएसटी ही करप्रणालीमधील सर्वात मोठी सुधारणा असल्याचा दावा केला होता. मात्र प्रत्यक्ष व्यवहारात या करप्रणालीची अंमलबजावणी करताना अनेक अडचणी येत आहेत. दरम्यान, जीएसटी करप्रणालीवरून भाजपा खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केंद्र सरकारला घरचा आहेर दिला आहे. जीएसटी हा २१ व्या शतकामधील सर्वात मोठा मूर्खपणा आहे, असा टोला स्वामी यांनी लगावला आहे.

स्वामी म्हणाले की, ‘ जीएसटी हा २१ व्या शतकातील सर्वात मोठा मूर्खपणा आहे. तुम्ही गुंतवणूकदारांना प्राप्तीकर आणि जीएसटीच्या माध्यमातून भयभीत करू नका. कुठे कुठला फॉर्म भरायचा हेच कुणाला समजत नाही, एवढा जीएसटी समजण्यास कठीण आहे. त्यात ही माहिती संगणकावर अपलोड करावी, अशी सरकारची अपेक्षा आहे.’

सध्या जीएसटीच्या माध्यमातून महसूल गोळा करण्यासाठी सध्या केंद्र सरकार झुंजत आहे. त्याच पार्श्वभूमीवर स्वामी यांनी केलेल्या या विधानामुळे सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत. गेल्या काही काळात सरकारला जीएसटीच्या माध्यमातून मिळणारा महसूल अपेक्षेनुरूप वाढलेला नाही. त्यामुळे जीएसटीच्या स्लॅबमध्ये वेळोवेळी बदल केले जात आहेत. दरम्यान, १ जुलै २०१७ पासून देशभरात जीएसटीची अंमलबजावणी सुरू झाली होती. त्यावेळी जीएसटीचे ५, १२, १८ आण २८ असे स्लॅब करण्यात आले होते. त्यानंतर या स्लॅबमध्ये वारंवार बदल करण्यात आले.

संबंधित बातम्या

जीएसटी रिटर्न भरण्यात महाराष्ट्र देशात अव्वल

खरेदी करा मोठी; मोदी सरकार देणार एक कोटी; अर्थमंत्रालयाची भन्नाट योजना

केंद्र सरकारने गोठविले ४0 हजार कोटी रूपयांचे दावे, जीएसटी विवरणपत्रांत विसंगती

देशाला जर २०३० पर्यंत महासत्ता बनायचे असेल तर दरवर्षी १० टक्के दराने आर्थिक वाढ होण्याची शक्यता आहे. जर ही गती कायम राहिली तर आपण २०५० मध्ये चीनला मागे टाकू आणि अमेरिकेला पहिल्या स्थानासाठी आव्हान देऊ, मात्र घटलेली मागणी ही सध्या भारतासमोरील सर्वात मोठी समस्या आहे. लोकांकडे खर्च करण्यासाठी पैसे नाहीत. त्याचा परिणाम आर्थिक चक्रावर होत आहे.  

टॅग्स :जीएसटीकेंद्र सरकारसुब्रहमण्यम स्वामीअर्थव्यवस्था