प्रसाद गो. जोशी
सप्ताहाचा प्रारंभ हा सकारात्मक वातावरणात झाल्यानंतर उत्तरार्धामध्ये मात्र कोरोनाने वाढविलेली चिंता, परकीय वित्तसंस्थांकडून होत असलेली विक्री आणि एकूणच सर्वत्र दिसत असलेली अनिश्चितता यामुळे शेअर बाजारावर मंदीचे मळभ दाटून आल्याचे दिसून आले. आगामी सप्ताहातही अशीच अनिश्चितता कायम राहण्याची चिन्हे दिसत आहेत. बाजाराचा प्रारंभ हा वाढीव पातळीवर झाला. त्यानंतर सेन्सेक्स ४९,६१७.४७ अंशांपर्यंत गेला. मात्र अखेरच्या दोन दिवसांमध्ये बाजारावर विक्रीचा मोठा दबाव आल्याने बाजार खाली आला. त्यामुळे सप्ताहाचा विचार करता निर्देशांक उणे बनला. बाजाराच्या सर्वच क्षेत्रांमध्ये हा प्रभाव जाणवला.
देशातील वाढलेले औद्योगिक उत्पादन, चलनवाढीचा तसा मर्यादेमध्ये असलेला दर या सकारात्मक बाबींपेक्षा कोरोना रुग्णांची वाढती संख्या बाजाराची चिंता वाढविणारी ठरल्याने सप्ताहाच्या उत्तरार्धात बाजार खाली आला. आगामी सप्ताहात कोणत्याही महत्वाच्या घटना, घडामोडी नसल्यामुळे या बाबींवरच बाजाराची दिशा अवलंबून राहणार आहे. अमेरिकेमध्ये बॉण्डवरील परतावा हे एक मुख्य कारण राहू
शकेल.
परकीय वित्तसंस्थांकडून विक्री सुरूच
देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेला बसणारी खीळ यामुळे परकीय वित्तसंस्थांकडून भारतीय शेअर बाजारामधून सातत्याने पैसे काढून घेणे सुरूच आहे. मे महिन्याच्या १५ दिवसांमध्ये या संस्थांनी ६४५२ कोटी रुपये काढून घेतले आहेत. यापैकी ६४२७ कोटी रुपये हे शेअरमधून तर २५ कोटी रुपये हे बॉण्डमधून काढून घेण्यात आले आहेत. एप्रिल महिन्यात परकीय वित्तसंस्थांनी भारतीय शेअर बाजारातुन मोठ्या प्रमाणावर रक्कम काढली आहे.
कोरोना, लसीकरणावर राहणार नजर
आगामी सप्ताहामध्ये भारतासह जगभरातील कोरोना रुग्णांची स्थिती, लसीकरणाचा वेग, विविध कंपन्यांचे जाहीर होणारे निकाल आणि पेट्रोल, डिझेलचे दर यावर बाजाराची दिशा ठरणार आहे.