सी. ए.उमेश शर्माअर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, पावसाळा आला की शेतकरी आकाशाकडे नजर लावून बसतो. काळे ढग पाऊस पाडतील की नाही, या विचारात शेतकरी असतात. त्याचप्रमाणे देशातील सरकार काळ्या पैशावर नियंत्रण ठेवण्यासाठी व विदेशातील काळा पैसा आणण्यासाठी म्हणजेच काळ्या पैशाचा पाऊस पाडण्यासाठी उपाययोजना करीत आहे.कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, खूप उचित बोललास! शेतकरी पावसाळा सुरू होण्यापूर्वी शेतामध्ये नांगरणी, मशागत करतो, बी बियाणे, खते शेतात पेरून आकाशातील काळ्या ढगांकडे पावसासाठी आस लावून बसतो. त्याला शेतीचे उत्पन्न मिळण्याच्या आधी खूप खर्च करावा लागतो व उत्पन्न मिळेल की नाही याची शाश्वती नसते. तसेच काळा पैसा परत आणण्यासाठी शासन अनेक उपाययोजना करीत आहे, परंतु त्यातील किती फलीभूत होतील हे देव जाणे! जसे काळे ढग अनेकदा दुसरीकडेच जाऊन वर्षाव करतात तसेच अनेक व्यक्ती काळा पैसा विदेशात लपवून ठेवतात. त्यासाठी नुकतेच या संबंधी शासनाने पारित केलेल्या ‘ब्लॅक मनी अॅन्ड इम्पोसिशन टॅक्स अॅक्ट २0१५’ या कायद्यान्वये २ जुलै २0१५ ला नोटिफिकेशन जाहीर केले आहे.अर्जुन : कृष्णा, काळा पैसा कमी कमी होण्यासाठी शासनाने कोणकोणत्या उपाययोजना केल्या आहेत?कृष्ण : अर्जुना, काळा पैसा म्हणजे पुस्तकात न दाखविलेला किंवा कर न भरण्यासाठी लपविलेला पैसा. जसे पाऊस येण्यासाठी शेतकरी पूजा-अर्चा, होमहवन इ. करतात तसेच शासन या काळ्या पैशावर पायबंद लावण्यासाठी अनेक उपाययोजना करीत आहे. त्यातील मुख्य पुढीलप्रमाणे आहे-१. शासनाने केंद्र्रीय अर्थ संकल्पात १ जून २0१५ पासून अचल संपत्तीचे व्यवहार रुपये २0,000च्या वर रोखीने करण्यास निर्बंध आणले आहेत. त्यामुळे या अचल संपत्तीच्या व्यवहारामध्ये वापरल्या जाणाऱ्या काळ्या पैशावर निर्बंध लागण्याची अपेक्षा आहे.२. शासनाने केंद्रीय अर्थसंकल्पात १ जून २0१५ पासून को-आॅपरेटिव्ह बँकेच्या ठेवीवर टीडीएस करण्याच्या तरतुदीमुळे काळा पैसा बाहेर येण्यास मदत होऊ शकते.३. शासनाने अनेक व्यवहारामध्ये पॅन नमूद करणे अनिवार्य केले आहे. उदा. रुपये एक लाखाच्या वर सोने खरेदी करताना पॅन नंबर देणे बंधनकारक झाले आहे.४. स्विस बँकेत पैसे असलेल्या भारतीयांची यादी इ. मिळविण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.५. भारतातील काळ्य पैशावर निर्बंध लावण्यासाठी बेनामी ट्रान्सॅक्शन बिल शासनाने या अर्थसंकल्पात आणले आहे.६. विदेशातील लपविलेला पैसा व संपत्ती यासाठी शासनाने ‘ब्लॅक मनी अॅन्ड इम्पोसिशन टॅक्स अॅक्ट २0१५’ आणला आहे.७. ज्याप्रमाणे शासनाचा डिजिटल इंडियावर जोर आहे, तसेच डिजिटलायझेशनमुळे शासनाच्या अनेक विभागांमध्ये करदात्याच्या माहितीची देवाणघेवाण वाढणार आहे. त्यामुळे लपविलेल्या पैशाची माहिती शासनाला मिळणार आहे.अर्जुन : कृष्णा, ब्लॅक मनी अॅन्ड इम्पोसिशन टॅक्स अॅक्ट २0१५ मध्ये काय दिले आहे?कृष्णा : अर्जुना, २६ मे २0१५ रोजी ‘ब्लॅक मनी अॅन्ड इम्पोसिशन टॅक्स अॅक्ट २0१५’ पारित झाला व १ जुलै २0१५ पासून अमलात आला आहे. हा कायदा विदेशात असणाऱ्या अनडिसक्लोज्ड पैसा व संपत्ती यासाठी आहे. शासनाने या कायद्याअंतर्गत प्रत्येक व्यक्तीला हा पैसा व संपत्ती जाहीर करून टॅक्स व पेनल्टी भरण्यासाठी एक संधी दिली आहे. यामध्ये करदात्याला फॉर्म-६ मध्ये अनडिसक्लोज्ड संपत्ती व पैशाचे डिक्लेरेशन भरून ३0 सप्टेंबर २0१५च्या आधी आयकर विभागाकडे दाखल करावयाचे आहे. या नंतर करदात्याला ३१ डिसेंंबर २0१५ पूर्वी या संपत्ती व पैशाच्या ३0 टक्के टॅक्स व त्यावर १00 टक्के पेनल्टी भरावी लागणार आहे. तसेच या २ जुलै च्या नोटिफिकेशनमध्ये या अनडिसक्लोज्ड संपत्तीचे कर आकारणीसाठी व्हॅल्युएशन कसे करावे व इतर माहिती नमूद केली आहे. असे म्हटले जाते ढग गरजले, विजा कडाडल्या पण पाऊस पडेल काय? तसेच या तरतुदीद्वारे काळा पैसा येईल का, यावर प्रश्न चिन्ह आहे.अर्जुन : कृष्णा, जर करदात्यांनी या संधीचा फायदा घेतला नाही तर काय होईल?कृष्णा : अर्जुना, या कायद्याअंतर्गत विदेशात लपविलेला पैसा व संपत्तीबद्दल खूप जाचक तरतुदी आहे. जर असे असेल तर करदात्याला ३0 टक्के टॅक्स व संपत्ती मूल्याच्या ९0 टक्के पेनल्टी व ३ ते १0 वर्षांपर्यंतची कैद होऊ शकते. जसे पाऊस पडला नाही तर शेतकऱ्याने शेतीसाठी लावलेला संपूर्ण पैसा मातीत जातो तसे जर या संधीचा फायदा घेतला नाही तर करदात्याने मिळविलेला व त्यापेक्षा जास्त पैसा आयकर विभागाकडे जाईल व तोंड काळे होण्याची वेळ येईल.
काळे ढग, काळा पैसा, देशात पडेल का पाऊस त्याचा?
By admin | Published: July 05, 2015 11:26 PM