Join us

जगाच्या अर्थव्यवस्थेवर मंदीचे काळे ढग; जोखीम वाढू लागली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2019 6:45 AM

अहवालानुसार येत्या काळात जागतिक अर्थव्यवस्थेच्या वृद्धीत नरमाई येण्याचे अनुमान आहे. २0१८ मध्ये ३ टक्के असलेला वृद्धीदर अंदाज २0१९ साठी २.९ टक्के केला आहे.

वॉशिंग्टन : जगाच्या अर्थव्यवस्थेवर मंदीचे काळे ढग गोळा होत असल्याचे जागतिक बँकेने आपल्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळेच जागतिक अर्थव्यवस्थेचा यंदाचा वृद्धीदर अंदाज घटवून बँकेने २.९ टक्के केला आहे. गेल्या वर्षी हाच दर ३ टक्के होता. जागतिक बँकेने मंगळवारी ‘जागतिक अर्थव्यवस्थेचे अनुमान’ हा अहवाल जारी केला. त्याप्रसंगी जागतिक बँक अनुमान समूह संचालक आयहन कोसे यांनी सांगितले की, जागतिक वृद्धीची गती मंदावत असून, जोखीम वाढत चालली आहे.

अहवालानुसार येत्या काळात जागतिक अर्थव्यवस्थेच्या वृद्धीत नरमाई येण्याचे अनुमान आहे. २0१८ मध्ये ३ टक्के असलेला वृद्धीदर अंदाज २0१९ साठी २.९ टक्के केला आहे. एकूण जागतिक व्यापार आणि होणारे वस्तूंचे उत्पादन यात मोठी घसरण दिसून येत आहे. जागतिक स्तरावर व्यापारी संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. काही विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात वित्तीय बाजार दबाव दिसून येत आहे. जागतिक बँकेने म्हटले की, यंदा विकसित अर्थव्यवस्थांचा वृद्धीदर घसरून २ टक्क्यांवर येणार आहे. उगवत्या बाजारपेठा आणि विकसनशील अर्थव्यवस्थांवर अनेक घटक प्रतिकूल परिणाम करीत आहेत. बाह्य मागणीतील घसरण, उसनवाऱ्यांचा वाढता खर्च आणि धोरणांतील अनिश्चितता यांचा त्यात समावेश आहे.  

टॅग्स :व्यवसायवर्ल्ड बँक