मुंबई : जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या चीनने आपल्या चलनात केलेल्या अवमूल्यनानंतर आणि संभाव्य मंदीचे संकेत जागतिक स्तरातून मिळू लागल्याच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारांपाठोपाठ भारतीय शेअर बाजाराला ‘ब्लॅक मंडे’चा फटका बसला आहे.
या घसरणीला जी विविध कारणे आहेत त्याचे विवेचन. बाजारावर मोठ्या प्रमाणावर विक्रीचा दबाव आल्याने संवेदनशील निर्देशांक सुमारे १६२५ अंशांनी घसरला. निफ्टीमधील घसरण सुमारे ५०० अंशांची राहिली. मिडकॅप आणि स्मॉल कॅप या निर्देशांकांची घसरण तर आणखी मोठी होती. हे दोन्ही निर्देशांक अनुक्रमे नऊ आणि १०.६ टक्कयांनी खाली आले. बाजाराच्या या घसरणीची कारणे खालीलप्रमाणे आहेत.
चीनमधील औद्योगिक उत्पादन घसरत असून त्यामुळे जगभरात चिंता निर्माण झाली आहे. यामधून जागतिक मंदी येण्याची भीतीही व्यक्त होत आहे. पेन्शन फंडांना भांडवली बाजारात गुंतवणूक करण्यास मिळालेली परवानगी तसेच चीनची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी युआन या चलनाचे दोनदा करण्यात आलेले अवमूल्यन या बाबीही चीनच्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यास अपयशी ठरल्या आहेत.
वॉलस्ट्रीटवरही घसरण
अमेरिकेच्या उत्पादन क्षेत्रातील वाढही अचानक कमी झाल्याने शुक्रवारीच अमेरिकेतील शेअर बाजार खाली आले होते. अमेरिकातील प्रॉडक्शन मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय)५२.९ वर आला आहे. गेल्या दोन वर्षांमधील हा नीचांक आहे. पीएमआय कमी झाल्याने औद्योगिक उत्पादन कमी होत असल्याचे स्पष्ट होत आहे.
ग्रीसबाबतची चिंता
ग्रीसमधील डाव्या विचारसरणीचे पंतप्रधान अॅलेक्सिस सिप्रास यांनी शुक्रवारी राजीनामा दिला आहे. आता राष्ट्राध्यक्षांनी कॉन्झर्व्हेटीव्ह पक्षाला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले असले तरी ग्रीस पुन्हा एकदा निवडणुकांकडे जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिलेले पॅकेज वांध्यात येणार आहे. या सर्व बाबींचा परिणाम म्हणजे ग्रीस युरोपियन युनियनच्या बाहेर जाण्याची शक्यता आहे. यामुळे युरोपातील शेअर बाजारांमध्येही घसरण झाली.
खनिज तेलाच्या किंमती
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाच्या किंमती सहा महिन्यांमधील नीचांकी पातळीवर आल्या आहेत. तेल उत्पादक देशांनी उत्पादन नियंत्रणात ठेवूनही किंमती घसरल्याने बाजारामध्ये चिंतेचे वातावरण आहे. (प्रतिनिधी)
चीनमुळे मंदी
चीनच्या उत्पादन क्षेत्रात सध्या मंदी असून याचा फटका आता जगभराला बसत आहे.
चीनने शेअर बाजाराला तारण्यासाठी पेंशन फंडमधील सुमारे ५४७ अब्ज डॉलर्स शेअर बाजारात गुंतवण्याचा आश्यर्चकारक निर्णय घेतला. मात्र, त्यालाही फारसा प्रतिसाद मिळाला नाही व चिनी अर्थव्यवस्थेची घसरण
सुरु च आहे.
रुपयाची घसरण
आयातदार आणि बॅँकांकडून डॉलरची मागणी वाढल्याने डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य घसरले. डॉलर-रुपयाचे विनिमय मूल्य आता ६६ रुपयांपेक्षाही वाढले असून गेल्या दोन महिन्यातील हा उच्चांक आहे. चीनने आपल्या चलनाचे अवमूल्यन केल्याने भारतावरही त्यासाठी दबाब वाढत आहे. रुपयाच्या घसरणीमुळे बाजारही घसरला. परकीय वित्तसंस्थांची माघार: गेले काही दिवस परकीय वित्तसंस्था भारतीय शेअर बाजारामधून मोठ्या प्रमाणावर रक्कम काढून घेत आहेत.
रघुराम राजन म्हणतात...
चीनमधील आर्थिक घडामोडी आणि मंदीमुळे भारतात शेअरबाजारात झालेली घसरण पाहता चिंता व्यक्त होत आहे. परंतु, भारताची आर्थिक परिस्थिती मजबूत आहे. डॉलरच्या तुलनेत आज रुपया ६६ पैशांनी घसरुन ६६.४९ पर्यंत खाली आला. गत दोन वर्षांतील ही रुपयाची सर्वात मोठी घसरण आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर घडणाऱ्या वेगवान आर्थिक घडामोडीत चीन शेवटच्या स्थानावर आहे. मात्र, जपानी येन आणि यूरोच्या तुलनेत रुपया सुस्थितीत आहे. बाजारातील चढ उतार पाहता त्यावर मात करण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडे पर्याय उपलब्ध आहेत.
व्याजदरात कपात करण्याचे संकेत
व्याजदरात कपात करण्याचे संकेत आज रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिले. जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रणात ठेवणे, सरकारने अन्नधान्याची प्रबळ व्यवस्था करणे यावर विशेष लक्ष असल्याचेही त्यांनी नमूद केले
जागतिक कारणांमुळे घसरण - जेटली
शेअर बाजारात सोमवारी झालेल्या अनपेक्षित मोठ्या घसरणीला जागतिक पातळीवरील खळबळ जबाबदार असल्याचे अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सांगितले. सरकार आणि रिझर्व्ह बँक या घडामोडींवर लक्ष ठेवून असून हा क्षणभंगूर परिणाम निघून जाताच परिस्थिती पुन्हा एकदा स्थिरस्थावर होईल, असे ते वार्ताहरांशी बोलताना म्हणाले.
जागतिक बाजारात गेल्या काही दिवसांत मोठी खळबळ निर्माण झाली होती व तिचा परिणाम स्पष्टपणे भारतीय बाजारावरही झाला. जे काही घडले त्याची कारणे ही देशाबाहेरची होती, असे त्यांनी सांगितले. देशातील एकही कारण त्यासाठी जबाबदार नव्हते. देशातील कोणत्याही एका कारणामुळे त्यात भर घातली अशीही परिस्थिती नाही. जागतिक पातळीवरील परिणामांना तोंड देण्यासाठी अर्थव्यवस्था बळकट करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
जेटली म्हणाले की,‘‘सरकार व रिझर्व्ह बँकेसह सर्व संबंधित अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत व आपापल्या जबाबदारीची त्यांना जाणीवही आहे. आमच्या पुरता विचार केला तर आम्हाला आमची अर्थव्यवस्था बळकट करायला हवी.
शेअर बाजारातील घसरण ही चीनमधील मंदी, युआनच्या अवमूल्यनामुळे सुरू असलेले चलनयुद्ध यामुळे जगभरातील शेअर बाजारांमध्ये झालेल्या विक्रीमुळे झाली. आगामी काळात असलेली फ्युचर्स अॅण्ड आॅप्शन्सची सौदापूर्ती आणि जगभरातील बाजारांमधील अनिश्चितता यामुळे बाजार अस्थिर राहण्याची शक्यता आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था चांगल्या वेगाने वाढती राहिल्यास बाजाराला आधार मिळू शकतो. गुंतवणुकदारांनी धीर न सोडता दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ही सुसंधी मानावी
- दिनेश ठक्कर, अध्यक्ष व
व्यवस्थापकीय संचालक, अॅँजल ब्रोकींग
शेअर बाजारात ‘ब्लॅक मंडे’
जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या चीनने आपल्या चलनात केलेल्या अवमूल्यनानंतर आणि संभाव्य मंदीचे संकेत जागतिक स्तरातून मिळू लागल्याच्या
By admin | Published: August 25, 2015 04:12 AM2015-08-25T04:12:28+5:302015-08-25T04:12:28+5:30