नवी दिल्ली : काळा पैसा प्रकटीकरण योजनेंतर्गत जाहीर करण्यात येणाऱ्या रकमेवरील कर आणि दंड अघोषित पैशांमधून भरता येणार नाही. अघोषित संपूर्ण रकमेवर कर आणि दंड लागेल. आयकर विभागाने गुरुवारी यासंबंधीचे स्पष्टीकरण केले आहे.
अघोषित रकमेमधूनच कर भरल्याची मुभा मिळाल्यास कमी कर भरावा लागला असता. ही बाब लक्षात घेऊन अघोषित असलेल्या संपूर्ण उत्पन्नावर कर लावण्यात येणार असल्याचा खुलासा आयकर विभागाने केला आहे. काळा पैसा प्रकटीकरण योजनेंतर्गत जाहीर करण्यात येणाऱ्या उत्पन्नावर ३0 टक्के कर, ७.५ टक्के अधिभार आणि ७.५ टक्के दंड, अशी सर्व मिळून ४५ टक्के रक्कम भरावी लागणार आहे. या योजनेत घोषित करण्यात आलेल्या रकमेतूनच कर, अधिभार आणि दंड भरल्यास प्रत्यक्षात घोषित उत्पन्नाच्या ३१ टक्केच रक्कम आयकर खात्याला मिळेल. कारण कर, अधिभार आणि दंडाची ४५ टक्के रक्कम त्यातून वगळली जाईल. हे होऊ नये, यासाठी आयकर विभागाने अघोषित उत्पन्नातून करभरणा करण्यास प्रतिबंध केला आहे.
वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या (एफएक्यू) उत्तरात यासंबंधीचे स्पष्टीकरण आयकर विभागाने केले आहे. वित्त कायदा २0१६ च्या कलम १८४ आणि १८५ मध्ये अघोषित उत्पन्नावर कर, अधिभार आणि दंड, अशी सर्व मिळून ४५ टक्के रक्कम भरावी लागेल, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
काळा पैसा, पांढरा कर!
काळा पैसा प्रकटीकरण योजनेंतर्गत जाहीर करण्यात येणाऱ्या रकमेवरील कर आणि दंड अघोषित पैशांमधून भरता येणार नाही.
By admin | Published: July 15, 2016 02:57 AM2016-07-15T02:57:55+5:302016-07-15T02:57:55+5:30