नवी दिल्ली : एचएसबीसी जिनिव्हा येथे काळा पैसा ठेवणाऱ्यांच्या यादीत नाव असलेल्यांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे़ या यादीत नाव असलेल्यांविरुद्ध ‘हेतुपुरस्सर’ करचोरी केल्याबद्दल १०० पेक्षा अधिक नव्या तक्रारी करण्याची तयारी आयकर विभागाने चालवली आहे़सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण आकलनाअंती याप्रकरणी तक्रारी दाखल केल्यानंतर कर आणि दंडरूपात आयकर विभाग सुमारे ३,२०० कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल गोळा करू शकतो़ कर अधिकारी यासंदर्भात आयकर कायद्याच्या कलम २७६ सी(१) आणि कलम २७६-डी अंतर्गत न्यायालयात आरोपींविरुद्ध तक्रारी दाखल करू शकतात़ प्रकरणाशी संबंधित एका सूत्राने सांगितले की, एचएसबीसी बँकेच्या जिनिव्हा शाखेत काळा पैसा ठेवणाऱ्यांविरुद्ध ३१ मार्चपूर्वी १०० वा यापेक्षा अधिक तक्रारी दाखल केल्या जातील़ आयकर विभाग सध्या सुमारे २४० एचएसबीसी प्रकरणांवर काम करत आहे़ या प्रकरणातील संदिग्ध भारतीयांनी अवैध मार्गाने कमावलेला पैसा विदेशी बँकांमध्ये ठेवल्याचा संशय आहे़गेल्यावर्षी ३१ डिसेंबरला आयकर विभागाने एकूण ६२९ भारतीय नावे व कंपन्यांपैकी १२८ प्रकरणांची कार्यवाही पूर्ण केली होती. ही नावे काही वर्षांपूर्वी फ्रान्सने भारताला दिलेल्या यादीत सामील होती़ या ६२८ लोकांपैकी २०० लोक अनिवासी भारतीय आहेत वा त्यांचा कुठलाही पत्ता लागलेला नाही़ त्यामुळे केवळ ४२८ प्रकरणातच आयकर विभागाद्वारे कारवाई होऊ शकते़ या प्रकरणी केवळ ३१ मार्चपर्यंतच कारवाई करता येईल़ यानंतर यासंदर्भात कुठलीही कायदेशीर कारवाई करता येणार नाही़(लोकमत न्यूज नेटवर्क)
काळा पैसा; आणखी नोंदवणार १00 तक्रारी
By admin | Published: February 22, 2015 11:54 PM