Lokmat Money > बिझनेस न्यूज > काळा ‘पैसा’ जाहीर करू ‘कैसा’?

काळा ‘पैसा’ जाहीर करू ‘कैसा’?

आयकर विभागाने इन्कम डिक्लरेशन स्कीम आणली आहे व त्याचे फॉर्मस्, नियम व इतर माहिती २० मे २०१६ला उपलब्ध केली आहे़ ही स्कीम काय आहे?

By admin | Published: May 23, 2016 05:09 AM2016-05-23T05:09:42+5:302016-05-23T05:09:42+5:30

आयकर विभागाने इन्कम डिक्लरेशन स्कीम आणली आहे व त्याचे फॉर्मस्, नियम व इतर माहिती २० मे २०१६ला उपलब्ध केली आहे़ ही स्कीम काय आहे?

'Black' will declare 'how'? | काळा ‘पैसा’ जाहीर करू ‘कैसा’?

काळा ‘पैसा’ जाहीर करू ‘कैसा’?

- सी. ए. उमेश शर्मा
अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, आयकर विभागाने इन्कम डिक्लरेशन स्कीम आणली आहे व त्याचे फॉर्मस्, नियम व इतर माहिती २० मे २०१६ला उपलब्ध केली आहे़ ही स्कीम काय आहे?
कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, शासनाने वर्ष २०१६च्या अर्थसंकल्पात इन्कम डिक्लरेशन स्कीमची घोषणा केली होती़ शासनाने मागील वर्षी विदेशी दडविलेली संपत्ती / उत्पन्न घोषित करून कर भरण्याची स्कीम आणली होती़ आता या वर्षी शासनाने देशातील दडविलेली संपत्ती वा उत्पन्न करण्यासाठी ही योजना आणली आहे़ मुख्यत्वेकरून काळ्या पैशाला रोखण्यासाठी ही योजना आणली आहे़ सन १९९७मध्ये व्हॉलंटरी इन्कम डिक्लरेशन स्कीम आणली होती़ पण ही नवीन योजना खूप वेगळी आहे.
अर्जुन : कृष्णा, या स्कीमची/योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत?
कृष्ण : अर्जुना, या स्कीमची/योजनेची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत:-
१) जर दडविलेली रक्कम उघड करण्यासाठी या स्कीममध्ये अर्ज केला तर दडविलेल्या उत्पन्नावर ३० टक्के आयकर, ७़५ टक्के सरचार्ज व ७़५ टक्के दंड असा एकूण ४५ टक्के कर भरावा लागेल़
२) या स्कीममधील घोषित कोणतेही उत्पन्न किंवा या उत्पन्नातून गुंतवणूक संपत्तीमध्ये केली असेल तर ती व त्याचे उत्पन्न आर्थिक वर्ष २०१५-१६पर्यंतचे असावे़ तसेच करदात्याने आयकर रिटर्न दाखल केलेले नसेल किंवा आयकर रिटर्नमध्ये हे उत्पन्न घेतले नसेल तर या स्कीममध्ये जाता येईल.
३) जर करपात्र उत्पन्न संपत्ती असेल तर त्या संपत्तीचे मूल्य १ जून २०१६च्या फेअर मार्केट व्हॅल्यू अनुसार घ्यावे लागेल़ उदा. जर एखादी संपत्ती जमीन २०१०-११मध्ये रु. ३ लाखांना घेतली असेल व त्याचे फेअर मार्केट व्हॅल्यू (स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यू) १ जून २०१६ला रु. ५ लाख असेल तर त्याला या स्कीममध्ये रु. ५ लाखावर कर भरावा लागेल.
४) या स्कीममध्ये १ जून २०१६पासून ३० सप्टेंबर २०१६पर्यंत अर्ज दाखल करता येईल.
५) करदात्याला कर, सरचार्ज व दंड एकूण ४५ टक्के ३० नोव्हेंबर २०१६च्या आधी भरावे लागेल.
६) या स्कीमचा अर्जदार व त्याची माहिती गोपनीय राहील.
अर्जुन : कृष्णा, या स्कीममध्ये कोणते करदाते अर्ज दाखल करू शकणार नाहीत?
कृष्ण : अर्जुना, १) जर करदात्याला ३१ मे २०१६पर्यंत आयकर विभागाकडून स्क्रुटीनीची किंवा इन्क्वायरी किंवा इन्कम एस्केपिंग असेसमेंटची नोटीस मिळाली असेल तर त्या वर्षाचे अर्ज दाखल करू शकणार नाही़ तसेच २) जर मागील वर्षात सर्च किंवा सर्वे झाला असेल व त्याविषयी नोटीस करदात्याला देण्याचा कालावधी संपला नसेल. ३) ज्या करदात्याचे विदेशी उत्पन्न किंवा संपत्ती ब्लॅक मनी अ‍ॅण्ड इंपोझिशन आॅफ टॅक्समध्ये मोडत असेल़ ४) भ्रष्टाचारातून मिळालेले उत्पन्न या स्कीममध्ये घेता येणार नाही़ यात सरकारी नोकरदारांना त्रास होईल.
अर्जुन : कृष्णा, या स्कीममध्ये जाण्यासाठी काय करावे?
कृष्ण : अर्जुना, १) करदात्याला फॉर्म - १मध्ये माहिती भरून तो आॅनलाइन डिजिटल सिग्नेचर किंवा ईव्हीसी किंवा पेपर फॉर्ममधेय ३० सप्टेंबर २०१६पर्यंत दाखल करावे लागेल़ २) आयकर कमिशनर महिना संपल्यानंतर १५ दिवसांच्या आत अ‍ॅकनॉजमेंट फार्म - २मध्ये देईल़ यामध्ये कमिशनर एन्कॉयरी करणार नाही़ ३) ४५ टक्के कर, सरचार्ज व पेनल्टी भरल्याची प्रत करदात्याला फॉर्म - ३मध्ये कमिशनरला द्यावी लागेल़ ४) १५ दिवसांच्या आत कमिशनर फॉर्म - ४मध्ये डिक्लेरेशन ग्राह्य असल्याचे सर्टिफिकेट देईल.
अर्जुन : कृष्णा, या स्कीमचे करदात्याला काय फायदे होतील?
कृष्णा : अर्जुना, १) जे उत्पन्न डिक्लेअर केले जाईल ते कोणत्याही वर्षाच्या कर आकारणीत परत धरले जाणार नाही़ २) आयकर व संपत्ती कर कायद्याच्या दंडाच्या किंवा दंडात्मक कार्यवाहीमध्ये हे उत्पन्न धरले जाणार नाही़ ३) बेनामी व्यवहार कायदा १९८८मधील तरतुदीपासून करदात्याला सुटका मिळेल़ ४) या स्कीममध्ये जर दडविलेली संपत्ती दर्शविली तर त्यावर संपत्ती कर (वेल्थ टॅक्स) मागील कोणत्याही वर्षासाठी लागणार नाही़ फेअर मार्केट व्हॅल्यूचे उचित मूल्यांकन करून सर्टिफाइड व्हॅल्यूवर करून घेतल्यास योग्य राहील.
अर्जुन : कृष्णा, या आयकराच्या स्कीममधून करदात्याने काय बोध घ्यावा?
कृष्ण : अर्जुना, शासन करदात्यांना दडविलेली रोख रक्कम व संपत्ती पुस्तकात आणण्यासाठी म्हणजेच काळ्याचा पांढरा करण्यासाठी ‘फेअर एन लव्हली’ स्कीम आणली आहे़ परंतु यामध्ये असलेल्या फेअर मार्केट व्हॅल्यूच्या अटीमुळे योजना किती सफल होईल व किती करदाते यामध्ये भाग घेतील हे देव जाणे़ भारतात सध्या विविध करकायद्यांत अशा सुविधाजनक योजना आणल्या आहेत़ त्याचा फायदा घेऊन कर चोरी कमी करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे़ या योजनेचा फायदा न घेतल्यास ३०० टक्के दंड, व्याज, फौजदारी इत्यादी कारवार्इंना तोंड द्यावे लागेल. दडविलेले सोने, चांदी, हिरे, जमीन इत्यादीसाठी योजना आणली आहे़ बघू या या योजनेच्या कुंभमेळ्यात किती लोक डुबकी मारून प्रायश्चित्त घेतात.

Web Title: 'Black' will declare 'how'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.