ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 16 - वित्त मंत्रालयाने काळ्या पैशाची माहिती देण्यासाठी प्रसारित केलेल्या ईमेल आयडीवर काळ्या पैशाची माहिती देणाऱ्या ईमेलचा पाऊस पडला आहे. देशातील नेटिझन्सनी ब्लॅकमनीवर मेल"वार" करताना काळ्या पैशाची माहिती देणारे सुमारे 38 मेल पाठवले आहेत. त्यापैकी सुमारे 6 हजार मेल वित्तमंत्रालयाने पुढील कारवाईसाठी पाठवले आहेत.
यासंदर्भातील वृत्त इकॉनॉमिक टाइम्स या संकेतस्थळाने दिले आहे. आरटीआय कार्यकर्ते जितेंद्र घाटगे यांनी वित्त मंत्रालयाने काळ्या पैशाची माहिती देण्यासाठी डिसेंबरमध्ये प्रसिद्ध केलेल्या blackmoneyinfo@incometax.gov.in या संकेतस्थळावर किती माहिती प्राप्त झाली आहे. यासंदर्भातील माहिती मागितली होती. त्याला प्रतिसाद देताना केंद्रीय अप्रत्यक्ष कर बोर्डाने (CBDT) सांगितले की, या संकेतस्थळावर आतापर्यंत एकूण 38 हजार 68 मेल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 6 हजार 50 मेल पुढील कारवाईसाठी आयकर विभागातील अधिकाऱ्यांकडे हस्तांतरीत करण्यात आले आहेत. तर उर्वरित 32 हजार 18 मेल कोणतीही कारवाई न करता बंद करण्यात आले आहेत.
मात्र यातील किती मेल चुकीचे होते याबाबत चौकशी पूर्ण झाल्यानंतरच माहिती मिळेल असेही स्पष्ट करण्यात आले आहे. डिसेंबर महिन्यामध्ये वित्त सचिव हसमुख अढिया यांनी काळ्या पैशाची माहिती देण्यासाठी हा ईमेल आयडी प्रसिद्ध केला होता.