Blinkit Offer : दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सणासुदीनिमित्त बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी वर्दळ पाहायला मिळत असते. लोक किराणा सामानापासून कपडे आणि वाहनापर्यंत सर्व काही खरेदी करतात. अशा परिस्थितीत दिवाळीपूर्वी झोमॅटोच्या मालकीच्या क्विक कॉमर्स कंपनी ब्लिंकिटने (Blinkit) एक नवीन ऑफर लाँच केली आहे. वास्तविक, ब्लिंकिटने आपल्या ग्राहकांसाठी ईएमआय (EMI) सुविधा सुरू केली आहे. ब्लिंकिटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अलबिंदर धिंडसा यांनी ब्लिंकिटमध्ये उपलब्ध असलेल्या या नवीन सुविधेबद्दल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टमध्ये माहिती दिली आहे.
अनेक लोकांना दिवाळीत खरेदी करण्याची इच्छा असते. मात्र, पैशाअभावी शक्य होत नाही. अशा लोकांसाठी ब्लिंकिटची ही योजना उपयोगी ठरणार आहे. अलबिंदर धिंडसा म्हणाले, "या योजनेमुळे अफोर्डेबिलिटीमध्ये सुधारणा होईल. शिवाय आमच्या ग्राहकांना चांगले आर्थिक नियोजन करण्यास मदत होईल"
या ऑर्डरवर मिळणार ईएमआय सुविधा
ब्लिंकिटवर या EMI सुविधेचा लाभ २९९९ वरील सर्व ऑर्डरवर लागू होईल. मात्र, ही सुविधा वापरून सोन्या-चांदीची नाणी खरेदी करता येणार नाहीत. धिंडसा यांनी X वर शेअर केलेल्या पोस्टमध्ये, वार्षिक आधारावर १५ टक्के व्याजासह नो कॉस्ट ईएमआयचा पर्याय देखील दिसत आहे.
झोमॅटो QIP च्या माध्यमातून 8,500 कोटी रुपये उभारणार आहे
ब्लिंकिंटची मूळ कंपनी झोमॅटो इक्विटी शेअर्सच्या क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंटद्वारे (QIP) ८,५०० कोटी रुपये उभारणार आहे. एक्सचेंज फाइलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या बोर्डाने पात्र संस्थात्मक प्लेसमेंटद्वारे ८,५०० कोटी रुपये उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
ब्लिंकिट काय आहे?
ब्लिंकिट एक क्विक कॉमर्स कंपनी आहे. ही कंपनी किराणा सामानापासून महागड्या वस्तूंपर्यंत सर्व काही होम डिलिव्हरी करत आहे. आयफोन १६ काही मिनिटांत घरपोच केल्याने ही कंपनी चांगलीच चर्चेत आली होती. सध्या बाजारात ब्लिंकिटला अनेक स्पर्धक आहेत. यात पुढे जाण्यासाठी आता ब्लिंकिटने ही नवीन ऑफर लाँच केली आहे.