quick commerce : गेल्या काही वर्षात क्विक कॉमर्स कंपन्यांनी देशात चांगलेच हातपाय पसरलेत. सॅटेलाईटच्या डिशपासून किचनमधील किराणा सामान काही मिनिटांत घरपोच मिळत आहे. आयफोन १६ देखील काही मिनिटांत ग्राहकांच्या हातात होता. शहरात ब्लिंकिट, झेप्टो आणि स्विगी इन्स्टमार्ट सारख्या क्विक कॉमर्स कंपन्या लोकप्रिय होत आहेत. मात्र, या कंपन्यांसमोर आता नवीन आव्हान उभं राहिलं आहे. वास्तविक, सणासुदीच्या काळात आणि वाढत्या स्पर्धेमुळे या कंपन्या ग्राहकांना घरघोस सवलती देत आहेत. पण हा ऑफर्सचा गेम त्यांच्याच अंगलट येत आहे.
किरकोळ विक्रेत्यांची तपास करण्याची मागणी
बाजारातील स्पर्धेमुळे क्विक कॉमर्स कंपन्या ग्राहकांना कमी किमतीत किंवा बंपर सवलत देतात. परंतु, आता किरकोळ वितरकांचा सर्वात मोठा समूह असलेल्या एआयसीपीडीएफने (AICPDF) ३ क्विक कॉमर्स कंपन्यांच्या विरोधात CCI कडे चौकशीची मागणी केली आहे. एआयसीपीडीएफचे म्हणणे आहे की झोमॅटोच्या ब्लिंकिट, स्विगी इन्स्टमार्ट आणि झेप्टो देत असलेल्या ऑफर्सची चौकशी झाली पाहिजे. रिपोर्ट्सनुसार, या तिन्ही कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सूट देत आहेत. यामुळे त्यांचे खिसे तर भरत आहेतच. पण स्थानिक किरकोळ विक्रेत्यांचे मोठे नुकसान होत आहे.
स्थानिक बाजारपेठ संपणार का?
क्विक कॉमर्स कंपन्या केवळ किराणा सामानापासून इलेक्ट्रॉनिक्सपर्यंतच्या वस्तूंची १० मिनिटांत होम डिलिव्हरी करत नाहीत तर त्यांनी ग्राहकांच्या सवयीही बदलल्या आहेत. यामुळे आघाडीचे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांनाही मोठं आव्हान निर्माण झालं आहे. क्विक कॉमर्सवर कंपन्या एवढी सवलत देत आहेत की, बाहेरच्या दुकानात १०० रुपयांना एखादी वस्तू मिळत असेल तर ती ९० रुपयांना विकत आहेत. त्यामुळे किरकोळ दुकानदारांचे नुकसान होत आहे. परिणामी स्थानिक बाजारपेठेत स्पर्धा संपत आहे.
उत्पादकांचे किरकोळ विक्रेत्यांकडे दुर्लक्ष
देशात सणासुदीचा हंगाम सुरू असताना फेडरेशनने तपासाची मागणी केली आहे. या काळात लोक भरपूर खरेदी करतात. CCI ला लिहिलेल्या पत्रात फेडरेशनने चिंता व्यक्त केली आहे की अनेक ग्राहकोपयोगी वस्तू कंपन्या थेट क्विक कॉमर्स कंपन्यांशी भागीदारी करत आहेत. मोठ्या कंपन्या आता स्थानिक किरकोळ विक्रेत्यांकडे दुर्लक्ष करत आहेत. हे तेच किरकोळ विक्रेते आहेत ज्यांनी उत्पादने उत्पादकांकडून किरकोळ विक्रेत्यांपर्यंत नेण्यात मोठी भूमिका बजावली आहे. आपल्या पत्रात फेडरेशनने पारंपरिक वितरक आणि लहान किरकोळ विक्रेत्यांच्या हिताचे रक्षण करण्याची मागणी केली आहे.