Join us  

रोख व्यवहारांवर ब्लॉकचेनचा उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2016 3:19 AM

चलनातील नोटांची स्थिती चांगली राखणे, खराब झालेल्या नोटा बाद करून त्या ऐवजी नव्या नोटा बाजारात आणून स्थैर्य राखणे

मुंबई : चलनातील नोटांची स्थिती चांगली राखणे, खराब झालेल्या नोटा बाद करून त्या ऐवजी नव्या नोटा बाजारात आणून स्थैर्य राखणे आणि एकूणच नव्या नोटा छापणे व त्याचे वितरण यावरली वार्षिक खर्चाने तब्बल १,८०० कोटी रुपयांचे प्रमाण गाठल्यानंतर आता भारतीय रिझर्व्ह बँकेने अधिक कडक पवित्रा घेत कॅशलेस व्यवहारांसाठी पुढाकार घेतला आहे. सध्याच्या कॅशलेस व्यवहारांच्या प्रचलित मार्गांसोबतच ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानाच्या वापराचीही चाचपणी सुरू केली आहे. या संदर्भात रिझर्व्ह बँकेने एक समिती स्थापन करण्याचे संकेत दिले असून या समितीच्या निष्कर्षानंतर आर्थिक व्यवहारात नवी साधने किंवा नव्या पद्धती विकसित करण्यात येणार आहेत. ब्लॉकचेनच्या या तंत्रज्ञानाची संकल्पना ही बिटकॉईनवर आधारीत असून, काही देशांतल्या मध्यवर्ती बँकांनी चलनी व्यवहाराचे प्रमाण कमी करण्यासाठी या डिजिलट चलनाचा वापर प्रायोगित तत्वावर सुरू केला आहे. त्याच धर्तीवर आता भारतातही या तंत्राचा वापर करता येईल का, याची चाचपणी या समितीद्वारे केली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. सर्वात मुख्य मुद्दा म्हणजे, हे चलन फक्त आणि फक्त आॅनलाईन आणि डिजिटल तंत्राद्वारे वापरले जात असल्यामुळे कागदी अथवा प्रत्यक्ष चलनाचा वापर होत नाही. परिणामी, कागदी चलनाच्या निर्मितीपासून जोपासनेपर्यंतच्या खर्चात मोठी बचत होते. चलनी व्यवहारांचे प्रमाण कमी करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे सातत्याने प्रयत्न होत आहेत. याकरिता डेबिट आणि क्रेडिट कार्ड तसेच आॅनलाईन बँकिंग, मोबाईल बँकिंग, मोबाईल व्हॅलेट अशा अनेक संकल्पना जोमाने राबविल्या जात आहेत. त्याचा वापर वाढावा म्हणून त्यांना प्रोत्साहनही देण्यात येत आहे. मात्र, तरीही लोकसंख्येच्या तुलनेत या वापराने अद्यापही अपेक्षित जोर पकडलेला नाही. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनकडून उपलब्ध ताज्या आकडेवारीनुसार देशामध्ये सध्या ६४ कोटी ३१ लाख ९० हजार डेबिट कार्ड असून दोन कोटी २७ लाख ४० हजार क्रेडिट कार्ड आहेत. याखेरीज सुमारे ६ ते ८ टक्के लोक हे वित्तीय व्यवहारांसाठी इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगचा वापर करत आहेत. कार्डाच्या माध्यमातून आॅनलाईन व्यवहारांची सुविधा उपलब्ध असली तरी बहुतांश लोकांचा कल हा एटीएममधून प्रत्यक्ष रोख रक्कम काढून ती खर्च करण्याकडे आहे. रोखीने व्यवहार करण्याचे आणि नोट चलनात अधिकाधिक फिरण्याचे प्रमाण प्रचंड असल्याने नोटा खराब होण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. परिणामी, एकिकडे रोखीने होणाऱ्या वित्तीय व्यवहारांचा खर्च आणि दुसरीकडे नोटा खराब होणे व त्या नष्ट करून नव्या नोटांची निर्मिती या खर्चामध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. ३१ मार्च २०१६ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये या गोष्टीसाठी तब्बल १८०० कोटी रुपये खर्ची पडले. यानंतर, हा खर्च रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेने आता या ‘ब्लॉकचेन’ तंत्राच्या वापरासाठी चाचपणी करण्यासाठी समिती गठित केली आहे. (प्रतिनिधी)>बिटकॉईनचे तंत्र कसे आहे ?ब्लॉकचेन तंत्राच्या वापरासाठी बिटकॉईन तंत्रज्ञानाच्या आणि व्यवस्थेच्या आधारावर मांडणी करण्याचा विचार सुरू आहे. बिटकॉईनचे तंत्र सध्या लोकप्रिय आहे.बिटकॉईनच्या चलनाचा सध्या वादाची किनार असली तरी दोन उद्योगसमुहातील आंतरराष्ट्रीय व्यवहार हे या चलनात होत आहेत. किंवा अनेक ठिकाणी आॅनलाईन व्यवहारांतील याचा वापर वाढत आहे. बिटकॉईन हे डिजिटल चलन असून, ज्याला हवे आहे, त्याने ते आॅनलाईन पैसे भरून विकत घ्यायचे आहे. हे चलन मग डिजिटल व्हॉलेटमध्ये ठेवता येते. याचा फायदा असा की, आंतरराष्ट्रीय व्यवहारात डॉलरचे मूल्य जसे वाढते अथवा कमी होते किंवा त्यातील अस्थिरता असते तशी अस्थिरता बिटकॉईनमध्ये नसल्याने व्यवहार करणाऱ्या दोन्ही घटकांना चलनातील अस्थिरतेतून होणाऱ्या तोट्यापासून स्वत:ला वाचविता येते.तसेच, जर एखाद्याला त्याच्याकडील बिटकॉईन त्याच्या देशातील स्थानिक चलनानुसार बदलून घ्यायचे असतील तरी ते करण्याची मुभा आहे. याकरिता व्यवहार शुल्क अतिशय कमी आहे.