Join us

ब्ल्यू चीप कंपन्यांनी सेन्सेक्सला तारले

By admin | Published: October 15, 2015 11:54 PM

शेअर बाजारांत तीन दिवसांपासून सुरू असलेल्या घसरणीचा सिलसिला गुरुवारी थांबला.

मुंबई : शेअर बाजारांत तीन दिवसांपासून सुरू असलेल्या घसरणीचा सिलसिला गुरुवारी थांबला. ब्ल्यू चीप कंपन्यांमध्ये जोरदार खरेदी झाल्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २३0.४८ अंकांनी वाढून २७ हजार अंकांचा टप्पा ओलांडून पुढे गेला. वाहन, सार्वजनिक कंपन्या आणि धातू या क्षेत्रात खरेदीचा जोर दिसून आला.आशिया आणि युरोपांतील बाजारांत आज तेजीचे वातावरण दिसून आले. त्याचा चांगला परिणाम भारतीय बाजारांतही पाहायला मिळाला. सणासुदीचा काळ सुरू झाल्यामुळे वाहनांच्या विक्रीत मोठी वाढ होईल, अशी अपेक्षा आहे. याचा परिणाम म्हणून वाहन उत्पादक कंपन्यांच्या समभागांत मोठी खरेदी दिसून आली. ३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स आज सकाळपासूनच सकारात्मक पातळीवर होता. २३0.४८ अंकांची अथवा 0.८६ टक्क्यांची वाढ नोंदवून सेन्सेक्स २७,0१0.१४ अंकांवर बंद झाला. गेल्या तीन सत्रांत सेन्सेक्सने ३00 अंकांची घसरण नोंदविली होती. ५0 कंपन्यांचा समावेश असलेला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७१.६0 अंकांनी अथवा 0.८८ टक्क्यांनी वाढून ८,१७९.५0 अंकांवर बंद झाला. अन्य लाभार्थी कंपन्यांमध्ये भेल, टाटा स्टील, गेल, कोल इंडिया, ओएनजीसी, एसबीआय आणि लुपीन यांचा समावेश आहे. एमअँडएम, विप्रो, हिंदाल्को, हिंद युनिलिव्हर, सिप्ला, एनटीपीसी, टीसीएस आणि इन्फोसिस यांचे समभाग मात्र 0.८६ टक्क्यांपर्यंत घसरले. श्रेणीनिहाय विचार करता बीएसई वाहन क्षेत्राचा निर्देशांक सर्वाधिक २.३३ टक्के वाढला. त्याखालोखाल सरकारी कंपन्या, तेल आणि गॅस, धातू भांडवली वस्तू आणि ऊर्जा या क्षेत्रांचे निर्देशांक वाढले.व्यापक बाजारांतही खरेदीचा उत्साह दिसून आला.