Join us  

सॅटर्डे क्लबतर्फे उद्योगबोध परिषद

By admin | Published: December 22, 2016 12:38 AM

सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट या उद्योजक संस्थेतर्फे १३ व १४ जानेवारी रोजी मुंबईत जागतिक स्तरावरील उद्योगबोध २0१७ ही औद्योगिक

मुंबई : सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट या उद्योजक संस्थेतर्फे १३ व १४ जानेवारी रोजी मुंबईत जागतिक स्तरावरील उद्योगबोध २0१७ ही औद्योगिक परिषद भरविण्यात येणार आहे. या परिषदेला राज्य व भारतातून, तसेच विविध देशांतून ११०० उद्योजक हजेरी लावणार असून, त्यांच्यासाठी व्यवसायाची देवाण घेवाण करण्यासाठी हे व्यासपीठ असेल, अशी माहिती सॅटर्डे क्लबचे कार्यकारी विश्वस्त माधवराव भिडे यांनी दिली. अभिनेते संदीप कुलकर्णी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे ब्रँड अँबेसेडर आहेत.भिडे म्हणाले की, १३ जानेवारी २०१७ रोजी दुपारी ४ वाजता पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहात होणार असून, त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. ट्रस्टचे विश्वस्त अजित मराठे म्हणाले की, सहार विमानतळाजवळील हॉटेल ललितमध्ये १४ जानेवारी रोजी मुख्य परिषद होईल. भांडवल, मार्केटिंग, लघु व मध्यम उद्योग, सागरी व्यवसाय संधी, यशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शन आदी विषयांवर परिषदेत चर्चा होईल. नवीन उद्योजक, व्यावसायिक, तसेच महिला उद्योजकांना असंख्य व्यावसायिक संधी मिळू शकतील, तसेच सरकार व उद्योजक यांच्यातील दरी कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होतील. क्लबतर्फे महिला उद्योजिकांसाठी विशेष मार्गदर्शन व कार्यक्रम घेतले जातात. गेल्या महिन्यातील जळगावच्या कार्यक्रमाला ३५० महिला उपस्थित होत्या. गेल्या वर्षी मुंबईतील सभासदांना सुमारे १५ कोटींचा व्यवसाय मिळाला, हेच सॅटर्डे क्लबचे वैशिष्ट्य आहे, असे माधवराव भिडे म्हणाले. (वाणिज्य प्रतिनिधी)