नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात मोठे चढ-उतार होत असलेले पाहायला मिळत आहे. बाजारातील घसरणीचा मोठा फटका गुंतवणूकदारांना बसत असल्याचे दिसत आहे. गेला आठवडाभरातील बाजाराच्या पडझडीमुळे गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपये बुडाल्याचे सांगितले जात आहे. अशातच इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात आघाडीवर असलेल्या आणि अल्पवधीच प्रचंड लोकप्रिय झालेल्या boAt ही कंपनी आता IPO आणण्याच्या तयारीत आहे.
डायरेक्ट टू कंझ्यूमर या सेग्मेंटमधील boAt देशातील सर्वांत मोठी कंपनी मानली जाते. कंपनी आपल्या ऑडिओ-केंद्रित इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांकरिता चांगलीच ओळखली जाते. या कंपनीने आता विस्तारासाठी IPO च्या माध्यमातून निधी उभारण्याचे ठरवले आहे. विशेष म्हणजे एका हिंदी वाहिनीवर सुरू असलेल्या शार्ट टँक इंडिया या कार्यक्रमात बोट कंपनीचे को-फाऊंडर आणि मॅनेजिंग डायरेक्टर अमन गुप्ता एक शार्क म्हणून सहभागी झाले आहेत.
IPO चा मसुदा सेबीकडे सादर करणार
या आठवडाभरात कंपनी आय.पी.ओचा मसुदा रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस भांडवल बाजार नियामक सेबीकडे सादर करणार आहे. कंपनीतील या घडामोडींची माहिती असणाऱ्या जेष्ठ व्यक्तिने नांव जाहीर न करण्याच्या अटीवर या बाबत अधिक माहिती दिली. नवी दिल्लीस्थित या कंपनीचा आय.पी.ओ द्वारे कंपनीचं मूल्यांकन दीड ते दो अब्ज डॉलर पर्यंत नेण्याचा मानस आहे. प्रायव्हेट इक्विटी क्षेत्रात प्रसिद्ध असणारी वॉरबर्ग पिंकसची, बोटमध्ये ३६ टक्के भागिदारी आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये क्वालकॉम व्हेन्चर्सच्या सहाय्याने कंपनीने ५० कोटी रुपये उभारले तेव्हा बोटचं मूल्यांकन सुमारे २२०० कोटी रुपये होती.
मार्च अखेरीस जवळपास दुप्पट महसूल
आता या आर्थिक वर्षासाठी त्याच्या महसुलाच्या सुमारे ५-६ पट मूल्यांकनावर लक्ष आहे, असे कंपनीबाबतची माहिती असणारे जाणकार सांगतात. बोटचा आयपीओ पाच ते सहा पट प्रिमियमने बाजारात येण्याची शक्यता आहे, असेही जाणकारांचे मत आहे. मार्च अखेरीस कंपनी जवळपास दुप्पट महसूल मिळवतील अशी अपेक्षा आहे, असेही म्हटले जात आहे.
दरम्यान, २०१६ मध्ये स्थापना झालेली, बोट ही कंपनी काही कालावधीतच देशातील प्रमुख डी2सी कंपनी म्हणून उदयास आली. या कंपनीने इयरफोन आणि वेअरेबल स्पेसमध्ये बाजारातील प्रमुख उत्पादकांना आव्हान दिले आहे. 31 मार्च २० २१रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात १५०० कोटी रुपयांच्या महसुलाच्या मागे ७८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला.