Join us

बोले तैसा चाले... आई-वडिलांच्या चेहऱ्यावर 'आनंद'; प्रज्ञानंदला गिफ्ट मिळाली 'ही' कार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 10:57 AM

अझरबैजान येथील जागतिक बुद्धीबळ स्‍पर्धेत भारताच्‍या १८ वर्षीय प्रज्ञानंद याला हरवून मॅग्‍नस कार्लसन जगज्‍जेता ठरला.

नवी दिल्ली - उद्योगपती आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर अधिक सक्रीय असतात. सोशल मीडियातून ते अनेकदा सर्वसामान्यांच्या बुद्धीमत्तेचं कौतुक करतात. त्यांच्या पसंतीस पडलेल्या किंवा हटके संशोधन करणाऱ्यांना ते थेट कार गिफ्ट करतात. देशातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या, देशाचं नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंनाही त्यांनी यापूर्वी कार गिफ्ट केल्या आहेत. महिंद्रा थार, बोलेरे किंवा महिंद्रा एसयुव्ही सारख्या महागड्या कार त्यांनी अनेकांना गिफ्ट केल्या आहेत. ऑगस्ट महिन्यात जगभरात भारताचं नाव कमावणाऱ्या भारतीय बुद्धीबळपटू प्रज्ञानंद याच्या उपविजेता पदाचा कौतुक करत, त्याच्या कुटुंबीयांस कार देण्याची घोषणा महिंद्रा यांनी केली होती. त्या घोषणेची नुकतीच पूर्तता करण्यात आली. 

अझरबैजान येथील जागतिक बुद्धीबळ स्‍पर्धेत भारताच्‍या १८ वर्षीय प्रज्ञानंद याला हरवून मॅग्‍नस कार्लसन जगज्‍जेता ठरला. मात्र, प्रज्ञानंदने उपविजेता पदाचा खिताब जिंकत जागतिक क्रमवारीत दुसर्‍या क्रमांकाचा बुद्धीबळपटू म्हणून देशाचा गौरव केला आहे. विशेष म्हणजे जागतिक बुद्धीबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचलेला तो वयाने सर्वात लहान खेळाडू ठरला आहे. त्याच्या या जगजेत्तेपदाच्या स्वप्नाचं कौतुक करत उद्योगपती आनंद महिंद्रांनी मोठी घोषणा केली होती. आता, त्या घोषणेची पूर्ती करुन महिंद्रांनी बोले तैसा चाले ही ब्रीद सत्यात उतरवलं आहे. 

सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील प्रज्ञानंदच्या या यशाचं देभरातून कौतुक झालं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रज्ञानंदचे  कौतुक केले आणि भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या. आता, प्रज्ञानंदने अंतिम लढतीत हार पत्करली असली तर कोट्यवधी भारतीयांची मने जिंकली आहेत. उद्योगपती आनंद महिंद्रा यांचेही मन जिकंलं आहे. म्हणून, त्यांनी प्रज्ञानंदला कार गिफ्ट देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार, प्रज्ञानंदसह त्याच्या आई-वडिलांकडे ही कार सुपूर्द करण्यात आली. प्रज्ञानंदने ट्विट करुन आनंद महिंद्रांचे आभारही मानले आहेत. माझ्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावर आज मोठा आनंद आहे, तुमची कार मिळाली. धन्यवाद, असे म्हणत प्रज्ञानंदने आनंद महिंद्रांचे आभार मानले आहेत. 

वडिल बँकेत करतात नोकरी

प्रज्ञानंदचा जन्‍म १० ऑगस्‍ट २००५ रोजी चेन्‍नई येथील पाडी येथे झाला. त्‍याचे पूर्ण नाव रमेशबाबू प्रज्ञानंद असून ‘प्रज्ञा’ हे त्याचे टोपणनाव नाव आहे. त्याचे वडिल बँकेत नोकरी करतात, तर आई नागलक्ष्मी गृहिणी आहेत. प्रज्ञानंदला एक मोठी बहीण असून ती देखील बुद्धीबळपटू आहे. प्रज्ञानंद भारतीय बुद्धीबळ चॅम्‍पियन विश्‍वनाथन आनंद यांना आदर्श मानतो.

प्रज्ञानंदसाठी PM मोदींचं खास ट्विट 

मोदींनी ट्विट केले होते की,'' युवा प्रतिभावान आर प्रज्ञानंदच्या यशाने आम्हा सर्वांना आनंद झाला. त्याने विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसन याच्याविरुद्ध मिळवलेल्या विजयाचा सार्थ अभिमान आहे. प्रज्ञानंदला पुढील वाटचालीसाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो.'', असे मोदींनी म्हटले होते.  

टॅग्स :आनंद महिंद्राकारबुद्धीबळ