Akshay Kumar Property Sell: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आता रिअल इस्टेटमध्येही 'खिलाडी' बनत चालला आहे. नुकताच त्यानं दोन फ्लॅटच्या विक्रीतून बंपर नफा कमावला. आता त्यानं ऑफिसची जागा ८ कोटी रुपयांना विकली आहे. अक्षय कुमारनं मुंबईतील लोअर परळ येथील ऑफिसची जागा विकली आहे. प्रॉपर्टी रजिस्ट्रेशनची कागदपत्रं स्क्वेअर यार्ड नावाच्या प्रॉपर्टी वेबसाईटनं दाखवली आहेत. एप्रिल २०२५ मध्ये हा करार पूर्ण झाला. अक्षय कुमारनं ही ऑफिस स्पेस विपुल रमेश मेहता आणि कश्मीरा विपुल मेहता यांना विकली. या ऑफिसबरोबरच त्यांना कार पार्किंगच्या दोन जागाही मिळाल्या आहेत. याआधी मार्च २०२५ मध्ये अक्षय कुमारनं मुंबईतील बोरिवलीतील आपले दोन फ्लॅट विकून ६.६ कोटी रुपये कमावले होते. त्यापैकी एक फ्लॅट ५ कोटी ३५ लाख रुपयांना विकला गेला. तर दुसरा सव्वा कोटी रुपयांना विकण्यात आला.
नोंदणी विभागाकडे (IGR) सादर केलेल्या कागदपत्रांनुसार ही कार्यालयाची जागा वन प्लेस लोढा येथे आहे. ही सुमारे १,१४६.८८ चौरस फुटांमध्ये पसरलेली आहे. यात दोन कार पार्किंगच्या जागांचा समावेश आहे. या व्यवहारात ४८ लाख रुपये मुद्रांक शुल्क आणि ३० हजार रुपये नोंदणी शुल्काचा समावेश होता.
ज्येष्ठांसाठी बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटीच्या (रेरा) माहितीनुसार, वन प्लेस लोढा हा व्यावसायिक प्रकल्प आहे. याची निर्मिती मॅक्रोटेक डेव्हलपर्सनं (लोढा) केली आहे. हा प्रकल्प १.०८ एकरमध्ये पसरलेले आहे. यात १७९ चौरस फूट ते २७,३९२ चौरस फुटांपर्यंत कार्यालयीन जागा आहेत.
सरासरी किंमत ४८ हजार रुपये प्रति चौरस फूट
स्क्वेअर यार्ड्स डेटा इंटेलिजन्सनं दिलेल्या माहितीनुसार, वन प्लेस लोढा येथे मे २०२४ ते एप्रिल २०२५ या कालावधीत एकूण आठ व्यवहार झाले. या व्यवहारांची एकूण किंमत ६१८ कोटी रुपये आहे. या प्रकल्पातील मालमत्तेची सरासरी किंमत ४८ हजार रुपये प्रति चौरस फूट आहे. लोअर परळ हा मुंबईतील सर्वोत्कृष्ट निवासी आणि व्यावसायिक भागांपैकी एक आहे. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) आणि नरिमन पॉईंट सारख्या व्यावसायिक क्षेत्रांशी ते उत्तमरित्या जोडलेलं आहे.
स्क्वेअर यार्ड्सच्या म्हणण्यानुसार, अभिषेक बच्चन, शाहिद कपूर, अमिश त्रिपाठी आणि मनोज वाजपेयी यांसारख्या बॉलिवूड स्टार्सचीही लोअर परळमध्ये घरं आहेत. आयजीआरच्या मालमत्ता नोंदणी कागदपत्रांमधून ही माहिती मिळाली आहे.
दोन फ्लॅट विकून बंपर नफा कमावला
नुकताच अक्षय कुमारनं विकलेल्या फ्लॅटवर बंपर नफा कमावला होता. ५.३५ कोटी रुपयांना विकलेला फ्लॅट अक्षय कुमारनं नोव्हेंबर २०१७ मध्ये केवळ २.८२ कोटी रुपयांना खरेदी केला होता. अशा प्रकारे त्याचं मूल्य ८९ टक्क्यांनी वाढले. अपार्टमेंटचा कार्पेट एरिया १००.३४ चौरस मीटर (१,०८० चौरस फूट) होता. फ्लॅटवर ३२.१ लाख रुपये स्टॅम्प ड्युटी आणि ३० हजार रुपये नोंदणी शुल्क होतं.
दुसरा फ्लॅट, जो अक्षय कुमारनं सव्वा कोटी रुपयांना विकला, तो त्याने २०१७ मध्ये ६७.१९ लाख रुपयांना खरेदी केला होता. अशा प्रकारे त्याचं मूल्य ८६ टक्क्यांनी वाढलं. या अपार्टमेंटचा कार्पेट एरिया २३.४५ चौरस मीटर (२५२ चौरस फूट) होता. या व्यवहारासाठी साडेसात लाख रुपये मुद्रांक शुल्क आणि ३० हजार रुपये नोंदणी शुल्क आकारण्यात आलं.