Lokmat Money > बिझनेस न्यूज > रणबीर कपूर अडचणीत, ईडीच्या रडारवर आलेला महादेव ॲप घोटाळा नक्की आहे तरी काय?

रणबीर कपूर अडचणीत, ईडीच्या रडारवर आलेला महादेव ॲप घोटाळा नक्की आहे तरी काय?

महादेव ॲपप्रकरणी अभिनेता रणबीर कपूर याची शुक्रवारी, ६ ऑक्टोबर रोजी ईडीचे अधिकारी चौकशी करणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 03:54 PM2023-10-05T15:54:33+5:302023-10-05T15:55:24+5:30

महादेव ॲपप्रकरणी अभिनेता रणबीर कपूर याची शुक्रवारी, ६ ऑक्टोबर रोजी ईडीचे अधिकारी चौकशी करणार आहेत.

bollywood actor Ranbir Kapoor in trouble Mahadev app scam on ED s radar for know detail scam | रणबीर कपूर अडचणीत, ईडीच्या रडारवर आलेला महादेव ॲप घोटाळा नक्की आहे तरी काय?

रणबीर कपूर अडचणीत, ईडीच्या रडारवर आलेला महादेव ॲप घोटाळा नक्की आहे तरी काय?

ऑनलाइन सट्टेबाजी ॲपच्या माध्यमातून सुमारे पाच हजार कोटी रुपयांच्या हवाला रॅकेटमुळे ईडीच्या रडारवर आलेल्या महादेव ॲपप्रकरणी अभिनेता रणबीर कपूर याची शुक्रवारी, ६ ऑक्टोबर रोजी ईडीचे अधिकारी चौकशी करणार आहेत. महादेव ॲप कंपनीच्या उपकंपनीच्या एका ॲपचे प्रमोशन रणबीर यानं केलं होतं व त्यासाठी त्यानं रोखीनं मानधन स्वीकारल्याचा ठपका ईडीने ठेवला असून, त्यासाठी त्याची चौकशी होणार आहे. 

छत्तीसगडचे रहिवासी सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल या दोघांनी महादेव बेटिंग ॲप लाँच केले. ईडीच्या म्हणण्यानुसार, “महादेव ऑनलाइन बुक बेटिंग ॲप हे एक मोठे सिंडिकेट आहे जे बेकायदेशीर बेटिंग वेबसाइटसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर नवीन युझर्सची नियुक्ती करण्यासाठी, युझर आयडी तयार करण्यासाठी आणि बेनामी बँक अकाऊंट्सच्या एका लेयर्ड वेबच्या माध्यमातून मनी लाँड्रिंगसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्मची व्यवस्था करते."

ईडीने अलीकडेच कोलकाता, भोपाळ, मुंबईसह अनेक शहरांमध्ये महादेव ॲपशी जोडलेल्या मनी लाँड्रिंग नेटवर्कच्या विरोधात शोध घेतला आहे आणि मोठ्या प्रमाणात पुरावे जमा केले आहेत. यादरम्यान, ४१७ कोटी रुपयांचं उत्पन्न गोठवण्यात किंवा जप्त करण्यात आलंय.

असं होतं काम
ॲपचा प्रचार करणाऱ्या जाहिरातीत एक व्हॉट्सॲप नंबर असल्याचं ईडीच्या तपासातून समोर आलं आहे. एकदा एखाद्या व्यक्तीने त्या नंबरवर मेसेज केला, तर तो कॉल सेंटरकडे पाठवला जातो. कॉल सेंटर ही माहिती पॅनेल ऑपरेटरला पाठवतं आणि पॅनेल ऑपरेटर व्यक्तीला ॲपसह खाते उघडण्यास, बेट लावण्यासाठी आणि पैसे मिळविण्यात मदत करतो.

ईडीच्या तपासानुसार, ४,०००-५,००० पॅनेल ऑपरेटर आहेत, त्यापैकी बहुतेक छत्तीसगड, मुंबई आणि दिल्ली येथे आहेत. महादेव ॲपचे संस्थापक आणि पॅनेल ऑपरेटर यांच्यातील नफा वाटणीचे प्रमाण ७०:३० आहे. तर ग्राहक आणि अॅपमधील नफा वाटणीचं प्रमाण ६०:४० आहे.

रणबीर कपूरचा अँगल
ईडीच्या तपासानुसार रणबीर कपूर बेकायदेशीर बेटिंग ॲपचा प्रचार करत होता. ॲपची जाहिरात करणाऱ्या अनेक सोशल मीडिया जाहिरातींमध्येही त्यानं काम केलं आहे. ईडीच्या तपासानुसार, त्यानं रोखीनं पेमेंट स्वीकारलं, जे एजन्सीनुसार गुन्ह्याच्या श्रेणीत येते. सूत्रांनी CNBC-TV18 ला दिलेल्या माहितीनुसार 'रणबीर कपूरने स्वीकारलेली रक्कम गुन्ह्यातील रक्कम होती की नाही आणि ॲप बेकायदेशीर आहे हे त्याला माहीत होते का, याबाबत ईडीला माहिती जाणून घ्यायची आहे.'

४ ॲप चालवत होता फाऊंडर
महादेव ॲपचे संस्थापक भारतात असेच ४-५ ॲप चालवत असल्याचं आतापर्यंतच्या तपासात समोर आलंय. त्याने पाकिस्तानातही असेच ॲप लाँच केलेय. संभाव्य ग्राहक या कॉल सेंटरना कॉल करतात. ते नेपाळ, संयुक्त अरब अमिराती आणि श्रीलंका येथे आहेत. एजन्सीच्या म्हणण्यानुसार, हे सर्व ॲप्स दररोज सुमारे २०० कोटी रुपयांचा नफा कमवत असल्याची माहिती समोर आलीये. दरम्यान, चित्रपट क्षेत्रातील (बॉलिवूड, टॉलिवूड आणि अन्य फिल्म उद्योग) आणि काही खेळाडूंनीही हे ॲप प्रमोट केल्याचा ईडीला संशय आहे. तसंच गुन्हेगारी श्रेणीत येत असलेल्या रोख रक्कमेचाही या प्रसिद्ध व्यक्तींनी स्वीकार केल्याचा संशय ईडीला आहे.

ईडीच्या म्हणण्यानुसार, सुमारे १०० सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर्सवर बेकायदेशीर महादेव ॲपचा प्रचार केल्याचा आणि रोख रक्कम स्वीकारल्याचा संशय आहे. दरम्यान, काही राजकीय लोकही ईडीच्या रडारवर आहेत. या प्रकरणी ईडीनं गेल्या महिन्यात छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे सल्लागार आणि मुख्यमंत्र्यांच्या दोन ओएसडींची चौकशी केली होती.

Web Title: bollywood actor Ranbir Kapoor in trouble Mahadev app scam on ED s radar for know detail scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.