सुरेश भटेवरा,
नवी दिल्ली- साखरेच्या किमतींवर नियंत्रण असावे आणि बाजारपेठेत मागणीनुसार पुरवठा असावा, यासाठी (कोलकाता सोडून) साऱ्या देशात साखरेची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी एक समान ५00 टनाची साठेमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. केंद्र सरकारने त्यासाठी जीवनावश्यक वस्तू कायद्यात बदल केले असून, ते सर्व राज्य सरकारांना मान्य करावे लागतील.
लागोपाठ दोन वर्षे दुष्काळी स्थितीमुळे देशात उसाचे उत्पादन घटले. परिणामी, साखरेचा पुरवठा घटल्याने साखरेच्या किमती
वाढल्या.
साखरेच्या किमती स्थिर राहाव्यात यासाठी केंद्राने २६ एप्रिल २0१६ रोजी ६ महिन्यांसाठी देशभर व्यापाऱ्यांसाठी ५00 टन व कोलक ात्यासाठी १ हजार टनाची साठेमर्यादा लागू केली.
जीवनावश्यक वस्तूंच्या कायद्यानुसार राज्य सरकारांना पूर्वी साठेमर्यादेत गरजेनुसार बदल करण्याचे अधिकार होते.
तथापि केंद्राने सरकारने १९६६ साखर नियंत्रण कायद्याच्या कलम १५ अन्वये आता सर्व
राज्यांसाठी साठेमर्यादा समान करण्याचे ठरवले आहे.
आॅल इंडिया शुगर
ट्रेडर्स असोसिएशनने सरकारचा हा आदेश बऱ्यापैकी अनुकूल असल्याचे म्हटले आहे.
>सरकारने घेतलेला निर्णय मान्य
आजवर राज्य सरकारांच्या अवाजवी हस्तक्षेपामुळे साखरेचा व्यापार प्रभावित होत होता. दिल्लीसारख्या राज्यात सरकारी आदेशानुसार अवघ्या १00 टन साखरेचा साठा करण्याचीच मुभा होती. खरंतर, ५३ वर्षांपूर्वी साखरेची १00 टनांची मर्यादा होते. दरम्यान, साखरेचा खप वाढला. मागणी व पुरवठ्यात तफावत झाली की साखरेच्या भावात चढउतार होतात. व्यापारात कोणताही अडथळा येता कामा नये, यासाठी साखरेची साठेमर्यादा हटवावी, अशी मागणी असोसिएशनने केली होती. तथापि सरकारने घेतलेला निर्णय मान्य केला आहे.
- प्रफुल्ल विठलानी, अध्यक्ष : शुगर ट्रेडर्स असोसिएशन
>गळीत हंगामाची
काही ठिकाणी सुरुवात
यंदा गळीत हंगाम मंद गतीने सुरू आहे. साखरेचे उत्पादन त्यामुळे ४४ टक्क्यांनी घटले आहे. महाराष्ट्राचा गळीत हंगाम आता सुरू होण्याची शक्यता आहे.
उत्तरेतील ६५ साखर कारखान्यांमधे गेल्या वर्षी ३१ आॅक्टोबरला गाळप सुरू झाले होते. यंदा अवघ्या २८ कारखान्यांनी हंगामाला प्रारंभ केला आहे.
‘इसमा’नुसार उत्तर प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटकात गाळप सुरू झाले
आहे, तर महाराष्ट्रात हंगाम ५ नोव्हेंबरपासून सुरू होईल. गतवर्षी आॅक्टोबर महिन्यात उत्तर प्रदेशात साखरेचे उत्पादन अत्यंत नगण्य स्वरूपाचे होते.
तथापि यंदा उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांत आजपर्यंत १२ हजार टन, कर्नाटकात ६९ हजार टन आणि तामिळनाडूत २0 हजार टन साखरेचे उत्पादन झाले आहे. १ आॅक्टोबरला सुरू झालेल्या यंदाच्या हंगामात साखरेचा ओपनिंग स्टॉक ७७ लाख टन आहे.
२९ आॅक्टोबर रोजी ६ महिन्यांची मुदत संपली, तेव्हा २८ एप्रिल २0१७पर्यंत या आदेशाला सरकारने मुदतवाढ दिली. साठेमर्यादा आदेशानुसार व्यापाऱ्यांनी ३0 दिवसांत साखरेच्या साठ्याची विक्री करणे बंधनकारक आहे.