नवी दिल्ली : ब्रिटनची बहुराष्ट्रीय एराेस्पेस अणि संरक्षण कंपनी ‘राेल्स राॅयस पीएलसी’वर तसेच कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. २४ हाॅक आणि ११५ ॲडव्हान्स्ड जेट ट्रेनर विमानांच्या खरेदीमध्ये भ्रष्टाचाराचा आराेप ठेवण्यात आला आहे. कंपनीने एकूण ७ हजार ४०० काेटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा करार केला हाेता.
कंपनीचे भारताचे संचालक टीम जाेन्स, शस्त्र विक्रेता सुधीर चाैधरी, भानू चाैधरी आणि ब्रिटिश एराेस्पेस सिस्टिम्स यांच्याविराेधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय काही अज्ञात सरकारी कर्मचारी व इतर व्यक्तींवरही गुन्हे दाखल केले आहेत. सीबीआयच्य माहितीनुसार, पदांचा गैरवापर करून अधिकाऱ्यांनी ७३४ दशलक्ष ब्रिटिश पाउंड एवढ्या रकमेचा हा व्यवहार केला. यासंदर्भात २०१६ मध्ये प्राथमिक चाैकशी करण्यात आली हाेती.
तंत्रज्ञान हस्तांतरणाचा केला हाेता करार
- वर्ष २००३ मध्ये ६६ हाॅक आणि ११५ जेट ट्रेनर विमानांच्या खरेदीला मंजुरी देण्यात आली हाेती. यासाठी भारत आणि ब्रिटनच्या सरकारमध्ये करारही करण्यात आला हाेता.
- २००४ मध्ये संरक्षण मंत्रालय आणि ब्रिटिश एराेस्पेस सिस्टिम (राेल्स राॅयस) यांच्यात दोन करार करण्यात आले हाेते. एक करार २४ हाॅक विमानांच्या थेट पुरवठ्याचा व दुसरा करार तंत्रज्ञान हस्तांतरणाचा हाेता.
१० काेटींची दिली लाच
२०१२ मध्ये ब्रिटनमध्ये गंभीर घाेटाळ्यांचा तपास करणाऱ्या विभागानेही कंपनीविराेधातील आराेपांची चाैकशी केली हाेती. कंपनीने परवाना शुल्क ४० काेटी रुपयांवरून ७५ काेटी रुपयांपर्यंत वाढविण्यासाठी भारतातील एका मध्यस्थाला १० काेटींची लाच दिल्याचे उघडकीस आले हाेते.