नवी दिल्ली - लग्नसराईच्या काळात सोनं खरेदी करण्याचा विचार करत असणाऱ्या ग्राहकांसाठी एक खूशखबर आहे. गेल्या काही दिवसात सोन्याच्या दरात झालेली वाढ आता काही प्रमाणात कमी झाली आहे. सोन्याच्या दरात घट झाली आहे. रुपया मजबूत झाल्यामुळे देशात गेल्या महिन्यापासून सोनं ५.७६ टक्के स्वस्त झालं आहे. सोन्याच्या दरात घसरण झाल्याने ग्राहकांना सोनं खरेदी करायची उत्तम संधी निर्माण झाली आहे.
सोन्याच्या दरात घट झाल्याने अनेक ग्राहकांनी अक्षयतृतीयेसाठी ऑर्डर देण्यास सुरुवात केली असल्याची माहिती काही ज्वेलर्सनी दिली. यावर्षी ७ मे रोजी अक्षयतृतीया आहे. अक्षयतृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोनं खरेदी करता यावं यासाठी ग्राहक आतापासून ऑर्डर देत आहेत. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांच्या तुलनेत मार्चमध्ये सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत वाढ झाल्याची माहिती ज्वेलर्सनी दिली आहे.
सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण
मंगळवारी (१९ मार्च) सोन्याचा दर हा ३१,९०० प्रति १० ग्रॅम (GST शिवाय) होता. मात्र एका महिन्यापूर्वी सोनं ३३,८५० रुपये होते. ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक काउंसिलचे माजी अध्यक्ष जी. वी. श्रीधर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'काही आठवड्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात सोने महाग झाले होते. मात्र रुपया मजबूत झाल्यामुळे भारतात सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. आम्हाला जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये चांगल्या व्यवसायाची अपेक्षा होती मात्र दोन महिन्यांत यासाठी सकारात्मक वातावरण नव्हते. सोमवारी रुपया मजबूत झाल्याने सोन्याच्या किंमतीत घट झाली आहे.' नवभारत टाइम्स या हिंदी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.
भारताकडे सद्यस्थितीत सोन्याचा ६०७ टन साठा
सोन्याचा सर्वात मोठा ग्राहक असलेल्या भारताकडे सध्या ६०७ टन सोन्याचे भंडार असून यात भारताचा ११ वा क्रमांक आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे २,८१४ टन सोने असून त्यांचा साठ्यात तिसरा क्रमांक आहे.अमेरिकेकडे ८,१३३.५ टन सोने, जर्मनी ३,३६९.७ टन, इटली आणि फ्रान्स २४०० टन सोनेसाठा असून ते पाचव्या क्रमांकावर आहेत. चीन आणि जपान या देशांकडे भारताच्या तुलनेत चांगला साठा आहे. चीनकडे १,८६४.३ टन तर, जपानकडे ७६५.२ टन सोने आहे. मार्केट इंटेलिजन्सचे संचालक एलिस्टेयर हेविट म्हणाले की, २०१८ मधील सोन्याच्या भंडारात झालेल्या वृद्धीनंतर २०१९ च्या सुरुवातील केंद्रीय बँकांकडे चांगल्या प्रमाणात सोने आहे. ४८ टन सोन्याच्या खरेदीनंतर आणि १३ टन विक्रीनंतर जागतिक सोन्याचे भंडार जानेवारीत ३५ टनांनी वाढले. यात ९ केेंद्रीय बँकांच्या वृद्धीचा समावेश आहे. २००२ पासूनची ही सर्वात मोठी वाढ आहे.