Car Sales in September : भारतात वाहन उत्पादक कंपन्यांनी सप्टेंबर महिन्यात ३.६३,७३३ कार्स आणि स्पोर्ट युटिलिटी वाहन म्हणजेच एसयुव्हीची विक्री करत विक्रम केला आहे. विक्रीमधील मोठ्या वाढीनंतर भारतात दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर स्टॉक ठेवण्यासाठी डिलर डिस्पॅचमध्येही तेजी आली आहे. तर दुसरीकडे सेमीकंडक्टरची उपलब्धता वाढल्यानं वाहन उत्पादक कंपन्याही प्रोडक्शन वाढवण्यात सक्षम झाल्या आहेत.प्रवासी वाहनांच्या मासिक विक्रीनं सप्टेंबरमध्ये सलग नवव्या महिन्यात सर्वोत्तम कामगिरी केली आहे. मागणी वाढल्यानं पहिल्यांदाच सहा महिन्यातील विक्री दोन मिलियनच्या पुढे गेल्याची प्रतिक्रिया मारुती सुझुकीचे मार्केटिंग आणि विक्री विभागाचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी शशांक श्रीवास्तव यांनी दिली. मारुती मोटर कॉर्प युनिटनं गेल्या महिन्यात १,५०,८१२ युनिट्सची विक्री केली. हे गेल्या वर्षाच्या या कालावधीत विकल्या गेलेल्या १,४८,३८० वाहनांच्या तुलनेत १.६ टक्क्यांनी अधिक आहे. कंपनीनं आपल्या एसयुव्ही फ्रोंक्स, जिम्नी, ब्रेझा आणि ग्रँड विटारा रेंजच्या मागणीमुळे पहिल्यांदा सहा महिन्यांच्या कालावधीत दहा लाखांपेक्षा अधिक वाहनांची विक्री झाली आहे.
सर्वच कंपन्यांची विक्रमी विक्रीसप्टेंबर २०२३ मध्ये आतापर्यंतची सर्वाधिक एकूण विक्रीचा आकडा गाठला आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये देशांतर्गत विक्रीत वार्षिक आधारावर ९ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ मिळवण्यात यश आलंय, अशी प्रतिक्रिया ह्युंदाई मोटर्स इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तरुण गर्ग यांनी दिली. त्यांनी गेल्या महिन्यात भारतीय बाजारपेठेत ५४,२४१ प्रवासी वाहनांची विक्री केली. तर महिंद्रा अँड महिंद्रानंदेखील सप्टेंबर महिन्यात विक्रमी विक्री नोंदवली. सप्टेंबर महिन्यात महिंद्राच्या कार्सची विक्री वाढून ४१,२६७ युनिट्स झाली.