Join us  

रिअल इस्टेटमध्ये तेजी; होऊ शकते 1.8 लाख घरांची विक्री, ‘ॲनारॉक’चा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 6:17 AM

real estate : संपत्ती सल्लागार संस्था ॲनारॉकने जारी केलेल्या ताज्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

नवी दिल्ली : कोविड-१९ साथीची दुसरी लाट ओसरल्यानंतर वास्तव संपदा (रिअल इस्टेट)  क्षेत्रात चांगली सुधारणा दिसून येत असून, २०२१ मध्ये देशातील प्रमुख सात शहरांतील घर विक्री ३० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. या वर्षात सुमारे १.८ लाख घरांची विक्री होऊ शकते.

संपत्ती सल्लागार संस्था ॲनारॉकने जारी केलेल्या ताज्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. कोविड-१९ साथीची दुसरी लाट ओसरल्यानंतर वास्तव संपदा क्षेत्रात झपाट्याने सुधारणा दिसून येत आहे. मात्र, या क्षेत्रास   कोविडपूर्व पातळीवर पोहोचायला आणखी काही वेळ लागू शकतो, असे अहवालात म्हटले आहे.  

ॲनारॉकने आपल्या अहवालात म्हटले की, २०२१ मध्ये देशातील सात प्रमुख शहरांतील घरांची विक्री वार्षिक आधारावर ३० टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. या वर्षात १,७९,५२७ घरे विकली जाण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी १,३८,३४४ घरांची विक्री झाली होती. २०१९ मध्ये २,६१,३५८ घरांची विक्री झाली होती.

अभ्यास करण्यात आलेल्या सात शहरांत दिल्ली-एनसीआर, मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई आणि कोलकाता या महानगरांचा समावेश आहे. ॲनारॉकने म्हटले की, २०२२ मध्ये घरांची विक्री २,६४,६२५ युनिट्सवर, तर २०२३ मध्ये ३,१७,५५० युनिट्सवर जाईल. 

...तर २०२० राहिले असते सर्वोत्तम वर्षॲनारॉकचे चेअरमन अनुज पुरी यांनी सांगितले की, गृहनिर्माण उद्योगात २०१७ ते २०१९ या काळात उत्तम वृद्धी दिसून आली होती. २०१९ च्या अखेरीस कोविड-१९ साथीचा हल्ला झाल्यानंतर मात्र परिस्थिती एकदम बदलली. साथ आली नसती तर २०२० हे गृहनिर्माण क्षेत्रासाठी सर्वोत्तम वर्ष राहिले असते. ॲनारॉकने म्हटले की, मागील वर्षाच्या तुलनेत २०२१ मध्ये घरांच्या प्रस्तावांत (ऑफर) ३५ टक्के वाढ होण्याची अपेक्षा आहे. या काळात विक्री ३० टक्के वाढू शकते.

टॅग्स :व्यवसाय