Lokmat Money > बिझनेस न्यूज > ॲपवरून झटपट कर्ज घेता आहात? - पुढे धोका आहे!

ॲपवरून झटपट कर्ज घेता आहात? - पुढे धोका आहे!

थकबाकी वसूल करण्यासाठी बँका कर्जदाराच्या घरासमोर बॅंड वाजवतात; ॲपवरून कर्ज देणारे घरी सरळ गुंड पाठवतात आणि अंगावरच हात टाकतात!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2023 07:48 AM2023-06-01T07:48:51+5:302023-06-01T07:50:43+5:30

थकबाकी वसूल करण्यासाठी बँका कर्जदाराच्या घरासमोर बॅंड वाजवतात; ॲपवरून कर्ज देणारे घरी सरळ गुंड पाठवतात आणि अंगावरच हात टाकतात!

Borrowing instantly from the app There is danger ahead know what are the cons | ॲपवरून झटपट कर्ज घेता आहात? - पुढे धोका आहे!

ॲपवरून झटपट कर्ज घेता आहात? - पुढे धोका आहे!

हल्ली कर्जाच्या ॲप्सचे पेव फुटले आहे. झटपट कर्ज मिळण्याच्या मोहात पाडून लोकांना लुटण्याचे प्रकार वाढले आहेत. अनेकदा सेक्सटॉर्शन किंवा कर्जाच्या ॲप प्रकरणात फसलेले लोक तक्रार करीत नाहीत. लोकापवाद म्हणजे समाजात होणारी बदनामी हा काल्पनिक राक्षस हीच या ब्लॅकमेल करणाऱ्या सगळ्या गुन्हेगारांची मोठी ताकद असते. 

सेक्सटॉर्शन हा शब्द अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यात १९५० मध्ये पहिल्यांदा वापरला होता.  समाजमाध्यमांचा, नव्या तंत्रसाधनांचा आणि संवादाच्या नवनव्या फलाटांचा जसजसा विस्तार होतो आहे तसतसे लैंगिक ई-छळाचे प्रमाण वाढत चालले आहे. अशा लैंगिक छळांसोबतच आर्थिक एक्सटॉर्शन म्हणजे खंडणीखोरीनेही समाजाला ग्रासले आहे. नव्या आधुनिक युगाचे हे दोन शाप दूर करायचे असतील, तर सर्व तपासयंत्रणा, समाजातील तंत्रकुशल तरुण आणि ई-साक्षर समाज या सर्वांना एकत्र लढा देण्याची गरज आहे. नाही तर गेल्या काही महिन्यांमध्ये ॲपद्वारे कर्ज घेतल्यानंतर झालेल्या छळामुळे राज्यात ज्या आत्महत्या झाल्या, त्यांचे प्रमाण भविष्यात वाढू शकेल.
आधुनिक साधने किंवा तंत्रज्ञानाचा आधार घेऊन गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना शोधून काढणे, त्यांच्यावर खटले भरणे आणि त्यांना शिक्षा होणे ही अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. त्यातच आपली पोलिस यंत्रणा अजूनही पूर्णतः तंत्रसक्षम  नाही.  

आधी संवादात गुंतवायचे, असे ई-संवाद वाढवायचे आणि जाळ्यात फसवून काही ना काही बोलायला, वागायला भाग पाडायचे आणि नंतर त्याचाच बागुलबुवा करून पैसे उकळायचे, अशी या गुन्ह्यांची पद्धत.  कर्जे देणाऱ्या ॲप्समध्येही पैसे उकळायचे हाच एकमेव मुख्य हेतू असतो.  या ॲप्सचा सुळसुळाट झाल्यामुळे कुणालाही फार सहजपणे कर्ज मिळते, असा गैरसमज झाला आहे. प्रत्यक्षात ती आधुनिक रूप ल्यायलेली पठाणी सावकारीच आहे. मुळात कर्ज देतानाच भक्कम व्याज कापून घ्यायचे आणि नंतर लगेच भांडवलासाठी तगादा लावायचा, गुंड पाठवायचे, धमक्या द्यायच्या, अशी ही रीत असते. आज हजारो लोक अशा कर्जाच्या सापळ्यात अडकत आहेत. 

पुण्यात धनकवडी आणि नंतर दत्तवाडी या भागांमध्ये काही दिवसांच्या अंतराने दोन तरुणांनी आत्महत्या केली. आपली सार्वजनिक बदनामी होईल, ही भीती एकदा तरुणांच्या मनात बसली की खंडणी उकळणे सोपे जाते. या खंडणीसाठी पैसे गोळा करण्याच्या नादातही अनेक तरुणांच्या हातून गुन्हे घडू शकतात. अनेकदा या मुलांकडे पैसे नसतात. तेव्हा अशा आत्महत्या होतात. अशा जाळ्यात आपण फसलो असलो तरी आपले नातलग, मित्र आणि समाज आपल्याला समजून घेईल, आपली बदनामी करणार नाही, असा विश्वास या तरुणांच्या मनात निर्माण करायला पाहिजे.  त्यांचे फोनवरचे वर्तन नैतिकदृष्ट्या चूक असेलही, पण त्याची शिक्षा लाखो रुपयांची खंडणी किंवा मृत्यू हे होऊ शकत नाही. अशा जाळ्यात फसलेल्या अनेक तरुणी किंवा तरुण पोलिसांकडे जात नाहीत. विश्वासाची भावना निर्माण झाली, तरच हे प्रमाण वाढू शकेल.  

समाजात होणारी बदनामी हा काल्पनिक राक्षस हीच या ब्लॅकमेल करणाऱ्या सगळ्या गुन्हेगारांची मोठी ताकद असते. ॲपवरून घेतलेली कर्जे न फेडल्यास मारहाण, दमदाटी, बदनामी करणे हे प्रकार होतात. थकबाकी वसूल करण्यासाठी कधी बँका घरासमोर बॅंड वाजवतात; ॲपवरून कर्जे देणारे घरी सरळ गुंड पाठवतात आणि कर्जदारांच्या अंगावर हात टाकतात. रिझर्व्ह बँकेने काही महिन्यांपूर्वी कर्जे देऊ करणाऱ्या अशा सहाशे ॲप्सवर बंदी घातली होती. यावरून हा चोरधंदा किती बळावला आहे याची कल्पना येते. गुगलनेही अशा काही ॲप्सवर बंदी घातली होती. मात्र हे पुरेसे नाही. असे ॲप्सवर किंवा सेक्सटॉर्शनचे प्रकार रोखणे हे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम आहे. आधुनिक तंत्रज्ञानाला गुलाम करून होणारे अशा स्वरूपाचे गुन्हे वाढतच जाणार आहेत. यासाठी समाजशिक्षण हा एकमेव पर्याय आहे.

- प्रा. मधुकर चुटे,
नागपूर

Web Title: Borrowing instantly from the app There is danger ahead know what are the cons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.