Join us  

७५० कोटींना खरेदी केलं घर, पण राहण्याची परवानगी नाही; ८ वर्षांपासून सायरस पूनावाला प्रतीक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2023 4:50 PM

पूनावाला यांनी ते घर २०१५ मध्ये ७५० कोटी रुपयांना विकत घेतलं होतं.

जरा कल्पना करा की तुम्ही तुमच्या स्वप्नातील घर विकत घेतलं आहे पण तुम्हाला त्यात राहण्याची परवानगीच मिळत नाही, त्यावेळी तुम्हाला कसं वाटेल. असाच काहीसा प्रकार प्रसिद्ध उद्योगपती सायरस पूनावाला (Cyrus Poonawalla) यांच्यासोबत घडला आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (SII) प्रमुख सायरस पूनावाला यांच्या बाबतीतही असाच प्रकार घडलाय. ८ वर्षांपासून ते आपल्या आलिशान घरात राहण्याची वाट पाहत आहे. पूनावाला यांनी ते घर २०१५ मध्ये ७५० कोटी रुपयांना विकत घेतलं होतं, परंतु आजपर्यंत त्यांना राहण्याची परवानगी मिळालेली नाही. आता या प्रकरणावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सायरस पूनावाला यांनी २०१५ मध्ये मुंबईतील लिंकन हाऊस खरेदी केलं होतं, परंतु जमिनीच्या मालकीवरून झालेल्या वादामुळे सरकारनं त्या खरेदीला तात्पुरती स्थगिती दिली होती. या तात्पुरत्या स्थगितीमुळे संपूर्ण पैसे भरूनही सायरस पूनावाला लिंक हाऊसमध्ये राहण्याची परवानगी मिळाली नाही. त्यांनी यावर आता नाराजी व्यक्त करत यासाठी सरकारला जबाबदार धरलंय.

जमिनीच्या मालकीवरून वादसायरस पूनावाला यांनी जो महाल विकत घेतला आहे, त्याच्या जमिनीच्या मालकीवरून वाद आहे. त्यामुळे त्यांना त्या घरात राहण्याची परवानगी नव्हती. या डीलवर स्थगिती देण्यात आली आणि सायरस पूनावाला ८ वर्षांपासून राजवाड्यात राहण्याची वाट पाहत आहेत. सरकारच्या या स्थगितीवर नाराजी व्यक्त करत त्यांनी हा राजकीय निर्णय असल्याचं म्हटलं आहे. 

हा करार रोखण्यासाठी कोणताही आधार नसल्याचे पूनावाला म्हणाले. “हा महाल विकला जावा आणि यासाठी दिलेली मोठी रक्कम अमेरिकेकडे जावी असं सरकारला वाटत नाही. जमिनीचा मालक कोण आहे, याचा वाद असून सुटला नाही. महाराष्ट्र सरकार आणि संरक्षण मंत्रालय दोघंही या जमिनीवर दावा करत आहे. तर दुसरकडे अमेरिकाही आपला दावा करत आहे,” असं त्यांनी ब्लुमबर्गशी बोलताना सांगितलं.

का आहे खास?मुंबईच्या ब्रीच कँडी भागात असेलेलं लिंकन हाऊस खूप खास आहे. हे घर दोन एकरात पसरले आहे. हे घर महालापेक्षा कमी नाही. जवळपास ५० वर्षे हे घर अमेरिकन सरकारची मालमत्ता होती. या जमिनीवर बांधलेले लिंकन हाऊस हे दीर्घकाळासाछी अमेरिकेचे वाणिज्य होते. २०१५ मध्ये, सायरस पूनावाला यांनी १२० दशलक्ष डॉलर्समध्ये ते विकत घेतलं. २०१५ मध्ये एका अमेरिकन डॉलरची किंमत ६४-६५ रुपये होती. त्यानुसार गणना केल्यास लिंकन हाऊसची किंमत भारतीय चलनात ७५० कोटी रुपये होती. आज या घराची किंमत ९८७ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. सायरस पूनावाला यांनी ७५० कोटींहून अधिक रक्कम भरली होती.

यामागची कहाणी काय?याच्या इतिहासाबद्दल सांगायचं झालं तर १९३८ मध्ये वांकानेरच्या महाराजांनी लिंकन हाऊस बांधलं. १९५७ मध्ये ते अमेरिकन सरकारनं ते भाड्यानं घेतलं. ही लीज ९९९ वर्षांसाठी होती. अमेरिकेनं तेथे आपलं वाणिज्य दूतावास उघडलं, परंतु नंतर त्यांचे दूतावास स्थलांतरित झालं, त्यानंतर त्यांनी लिंकन हाऊस विकण्याचा निर्णय घेतला. २०१५ मध्ये सायरस पूनावाला यांनी ते अमेरिकेतून ७५० कोटींना विकत घेतलं होते, मात्र आतापर्यंत ते या घरात राहण्याची वाट पाहत आहेत.

टॅग्स :मुंबईसरकारअमेरिका