मु्ंबई - आठवड्यातील पहिल्याच दिवशी सोमवारी शेअर बाजारात जोरदार उसळी दिसून आली. सेन्सेक्स १२०० अंकांनी वाढून ७१,९०० अंकांपर्यंत पोहोचला होता. तर निफ्टीही ४०० अंकांनी वधारून २१,७०० अंशांवर पोहोचला होता. सोमवारच्या तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सोमवारी ६ लाख कोटी रुपयांनी वाढ झाली.
सेन्सेक्सच्या ३० पैकी २५ शेअर्सपैकी केवळ ५ मध्ये घट झाल्याचे दिसले. ‘ओएनजीसी’चे समभाग ८ टक्के, तर रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग ७ टक्क्यांनी वाढले. अडानी एन्टरप्रायझेसचे समभाग ६ टक्क्यांनी वधारले. टेक महिंद्रा, सिप्ला आणि एअरटेलचे समभाग घसरल्याचे दिसून आले.
मागच्याच आठवड्यात २५ जानेवारी रोजी बाजारात घसरण झालेली पाहायला मिळाली होती. सेन्सेक्स ३५९ अंकांनी घसरून ७०,७०० अंकांवर स्थिरावला होता. बँक निफ्टीही १०१ अंकांनी घसरून २१,३५२ वर बंद झाला होती. नफा कमावण्यासाठी गुंतवणूकदारांनी विक्रीची जोरदार मारा केला होता.
बाजारात तेजीची कारणे
- रिलायन्स आणि एडीएफसी बँक यासारख्या बाजारात मोठा हिस्सा असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी
- जागतिक बाजारांतील तेजीमुळे भारतीय बाजाराला मिळालेले पाठबळ
- परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारात गुंवणुकीसाठी दाखविलेले उत्साह
- सरकारच्या दुसऱ्या टर्मचा शेवटचा अर्थसंकल्प असल्याने बाजाराला अपेक्षा आहेत. परिणामी गुंतवणूकदारांनी खरेदीचा जोर लावल्याचे दिसले.
रिलायन्स इंडस्ट्रीजची ५ तासांत सव्वालाख कोटींची कमाई
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरच्या किमतीनी सोमवारी विक्रमी उच्चांक गाठला. सोमवारी एकूण भांडवली मूल्य १९ लाख कोटींच्या घरात पोहोचल्याने रिलायन्स कंपनी देशातील सर्वांत मोठी कंपनी बनली आहे.
बीएसई सेन्सेक्समध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर ४.१९ टक्क्यांनी वधारून २,८२४ रुपयांवर पोहोचला, तर एनएसईमध्ये कंपनीचा शेअर ४.३५ टक्के वाढून २,८२४ रुपयांवर पोहोचला.
तेलापासून दूरसंचार क्षेत्रात अग्रणी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे निव्वळ नफा चालू वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत ९.३ टक्क्यांनी वाढला.
रिलायन्स कंपनीच्या विजेच्या कारभारात सोमवारी थोडीशी नरमी दिसून आली; परंतु कंपनीच्या रिटेल आणि दूरसंचार उद्योगाने ही नरमी भरून काढली. ग्राहक व्यवसाय सातत्याने वाढत असल्याने कंपनीचा नफा वाढला आहे.