Join us  

सोन्याच्या घसरणीला ब्रेक

By admin | Published: June 09, 2016 5:07 AM

स्थानिक सराफांनी केलेली जोरदार खरेदी यामुळे बुधवारी सोने १३0 रुपयांनी वधारून २९,१६0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले.

नवी दिल्ली : परदेशातील बाजारात वाढलेली मागणी आणि त्यामुळे स्थानिक सराफांनी केलेली जोरदार खरेदी यामुळे बुधवारी सोने १३0 रुपयांनी वधारून २९,१६0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले. चांदीनेही सोन्याचाच कित्ता गिरवत ३५0 रुपयांनी उसळी मारली. त्यामुळे चांदीचा भाव ३९,५00 रुपये प्रतिकिलो झाला. नाणे उत्पादक आणि कारखानदार यांच्याकडून मागणी वाढल्याने चांदीचे भाव वाढले.परदेशातील बाजारात मागणी वाढल्याचा अनुकूल परिणाम स्थानिक व्यापाऱ्यांवर झाला; त्यांनीही जोरदार खरेदी केल्याने सोन्याचे भाव वाढल्याचे बाजारातील सूत्रांनी सांगितले. जागतिक स्तरावर सिंगापूर येथे सोन्याचे भाव 0.७३ टक्क्यांनी वाढून १२५२.३0 डॉलर प्रतिऔंस झाले. चांदीचे भावही १.७१ टक्क्यांनी वाढून १६.६२ डॉलर प्रतिऔंस झाले. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत ९९.९ आणि ९९.५ या दोन्ही शुद्धतेच्या सोन्याचे भाव अनुक्रमे १३0 रुपयांनी वाढून अनुक्रमे २९,१६0 रुपये प्रति १0 ग्रॅम आणि २९,0१0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले. सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसांत सोने १९५ रुपयांनी वधारले होते. चांदीचे भाव ३५0 रुपयांनी वाढले तरीही चांदीच्या नाण्याचे भाव मात्र स्थिर राहिले. १00 नाण्यांच्या खरेदीचा भाव ६७ हजार रुपये, तर विक्रीचा दर ६८ हजार रुपये हेच कायम राहिले. (लोकमत न्यूज नेटवर्क)