Join us

ब्रेकिंग : देशातील 10 बँकांचे विलीनीकरण, वित्तमंत्र्यांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2019 4:54 PM

देशावर घोंघावत असलेल्या आर्थिक मंदीच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकिंग क्षेत्रासाठी मोठी घोषणा केली आहे.

नवी दिल्ली - देशावर घोंघावत असलेल्या आर्थिक मंदीच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकिंग क्षेत्रासाठी मोठी घोषणा केली आहे. आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सीतारामन यांनी देशातील दहा राष्ट्रियीकृत बँकांचे विलीनीकरण करण्याची घोषणा केली आहे. विलीनीकरण करण्यात येणाऱ्या बँकांमध्ये पंजाब नॅशनल बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, युनायटेड बँक, कॅनरा बँक, सिंडीकेट बँक यांचा समावेश आहे. या निर्णयामुळे देशातील सार्वजनिक क्षेत्रामधील बँकांची संख्या 27 वरून 12 पर्यंत आली आहे. 

बँकिंग क्षेत्राबाबता मोठा निर्णय जाहीर करताना निर्मला सीतारामन म्हणाल्या की, ''2017 मध्ये देशात 27 सार्वजनिक क्षेत्रातील बँक होत्या. सध्या देशा असलेल्या सार्वजनिक क्षेत्रामधील 18 बँकांपैकी 14 बँका नफ्यामध्ये आहेत. सार्वजनिक क्षेत्रामधील बँकांपैकी काही बँकांचे विलीनीकरण करण्याच निर्णय घेतला आहे. यानुसार युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि ओरिएंटल बँक यांचे पंजाब नॅशनल बँकेमध्ये विलीनकरण करण्यात येईल. या विलीनीकरणानंतर पंजाब नॅशनल बँक देशातील दुसरी सर्वात मोठी बँक बनेल.'' 

''सरकारी क्षेत्रामधील कॅनरा बँक आणि सिंडिकेट बँक यांचे विलीनीकरण करण्यात येईल. तसेच युनियन बँक ऑफ इंडियामध्ये आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँक यांचे विलीनीकरण होईल. त्यामुळे ही बँक सार्वजनिक क्षेत्रातील पाचवी सर्वात मोठी बँक ठरेल.  त्याशिवाय अलाहाबाद बँकेमध्ये इंडियन बँकेचे विलीनीकरण होईल. त्यानंतरी ही बँक सार्वजनिक क्षेत्रातील सातवी सर्वात मोठी बँक बनेल,'' अशी माहिती सीतारामन यांनी दिली. 

मात्र प्रादेशिक वैशिष्ट कायम राखण्यासाठी काही बँकांचे विलीनीकरण करण्यात आलेले नाही. तसेच सार्वजनिक क्षेत्रामधील काही बँकांचे विलीनीकरण झाले असले तरी या बँकांमधील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा येणार नाही, असेही सीतारामन यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :बँकिंग क्षेत्रनिर्मला सीतारामन